वटसावित्री पौर्णिमा : पर्यावरणपूरक भारतीय सण

05 Jun 2020 12:45:58



आज ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी करतात. त्यातही महिलांच्या दृष्टीने वटसावित्री पौर्णिमा, हरतालिका आणि मकर संक्रांत जास्त महत्त्वाचे दिवस असतात. वटपौर्णिमा हे व्रत 'सत्यवान सावित्री'शी संबंधित आहे. पतिव्रता सावित्रीने तिचा पती सत्यवानाचे प्राण यमाच्या पाशातून परत आणले होते. मृत्युदेवता यमाला हरविणारी सावित्री ही कदाचित जगातील पहिलीच पतिव्रता असावी. आज जागतिक पर्यावरण दिन आणि संत कबीर जयंतीसुद्धा आहे. वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व सांगणारा लेख...


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे शक्य नसणाऱ्या स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत आवर्जून करतात. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी दरवर्षी नित्यनेमाने हे व्रत करतात. सावित्रीसहित ब्रह्मदेव या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान-सावित्री, नारद आणि यम या उपांग देवता आहेत. नदीतील वाळू आणून त्यावर सत्यवान आणि सावित्रीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यांची षोड्शोपचार पूजा करावी व ५ अर्घ्य द्यावेत. सावित्रीची मनोमन प्रार्थना करावी. यानंतर सायंकाळी सुवासिनी मैत्रिणींसह सत्यवान सावित्री कथा ऐकावी. परंतु आजकाल सावित्रीच्या मूर्तीची महिला पूजा करीत नाहीत. वडाच्या झाडाची पूजा करतात व प्रदक्षिणा घालत वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात.  

सावित्री हे महान आणि आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून स्वत: पसंत केलेल्या सत्यवानाशी आई-वडील व देवगुरू नारदाचा विरोध डावलून विवाह केला. पतीचा लवकरच मृत्यू होणार आहे, हे माहीत असूनसुद्धा जबर इच्छाशक्ती आणि चातुर्य या बळावर पतिव्रता सावित्रीने प्रत्यक्ष यमाला नमवून त्याच्याकडून पतीचा प्राण परत मिळविला. यामुळेच सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व भावी पिढीच्या महिलांना कळावे यासाठी योगी अरविंद यांनी सावित्री हे महाकाव्य लिहिले. 

 
वडाचीच पूजा का? 
भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ, उंबर पवित्र वृक्ष मानतात. त्यात वटवृक्ष म्हणजे वड. हा वृक्ष सर्वांत दीर्घायुषी आहे. पारंब्याचा विस्तार होणारा हा एकमेव वृक्ष आहे. अशा या वडाच्या झाडाचे पर्यावरण दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वृक्षवल्ली - निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची वटपौर्णिमा ही संधी आहे. योगायोगाने आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आजकालच्या तथाकथित आधुनिक विचारांच्या महिला रस्त्यावरील वडाची पूजा करीत नाहीत. इतक्या लांब पायी कशाला जायचे? असा विचार करून वडाची फांदी तोडून आणून घरातच त्या वडाच्या फांदीची पूजा करून फांदीलाच फेऱ्या मारून या महान व्रताची अनौपचारिकता दाखवितात. ही अनिष्ट प्रथा आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बंद करायला हवी व 'वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन, बटाग्रे तु शिवो देव: सावित्री वट संश्रिता' हा मंत्र म्हणून महिलांनी प्रार्थना करावी. 

अनेक वर्षांपूर्वी भद्र नावाच्या देशावर अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची सुंदर व गुणी मुलगी होती. राजाने सावित्रीला तिचा पती पसंत करण्याचे स्वातंत्र्य दिले. तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. हा राजपुत्र सत्यवान शाल्व राज्याचा राजा धृमत्सेनचा पुत्र होता. धृमत्सेन अंध असल्याचा गैरफायदा घेऊन शेजारच्या राजाने धृमत्सेनाचे राज्य बळकावले. त्यामुळे धृमत्सेनावर जंगलात वास्तव्य करण्याची पाळी आली. त्यामुळे राज्य नसलेल्या सत्यावानाशी विवाह करू नकोस, अशी तिची परोपरीने समजूत घातली, तसेच देवगुरू नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एकच वर्ष शिल्लक आहे याची माहिती होती. त्यामुळे नारदानेही सावित्रीला सत्यवानासोबत विवाह करू नकोस, असा उपदेश केला. पण सावित्री आपल्या निर्णयावर अटळ राहिली व तिने सत्यवानाशीच विवाह केला व पतीसह वनात राहून सासूसासऱ्यांची सेवा करू लागली.

सत्यवानाचा तीन दिवसांनी मृत्यू होईल हे सावित्रीला जाणवले. तिने पतीला वाचविण्यासाठी तीन दिवस व्रत केले. पौर्णिमेच्या दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी जंगलात जायला निघाला. त्यावेळी सावित्रीसुद्धा पतीसोबत गेली. लाकडे तोडत असतानाच सत्यवान चक्कर येऊन जमिनीवर पडला. नित्याप्रमाणे यम आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागोमाग जाऊ लागली. यमलोकात तुला येता येणार नाही, हे यमाने सावित्रीला परोपरीने समजावून सांगितले; पण सावित्रीने नाकारले व मी पतीसोबतच येईन, असा हट्ट धरला. त्यामुळे यमाने मी तुला तुझ्या पतीच्या प्राणाच्या बदल्यात तीन वर देतो. तुला हवे ते माग, पण माघारी फिर. सावित्रीने मान्य केले, पण चतुराईने सासू-सासऱ्यांना दृष्टी मिळावी, त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे व त्यांना नातू मिळावा, असे तीन वर मागितले. पतीशिवाय सावित्रीला पुत्र होणार नाही व सावित्रीच्या सासू-सासऱ्यांना नातू मिळणार नाही, हे यमाच्या लक्षातच आले नाही व यम 'तथास्तु' म्हणाला, पण चूक लक्षात आल्यावर त्याने सत्यवानाचे प्राण परत दिले. पुढे सत्यवान सावित्रीने अनेक वर्षे राज्य केले, अशी आख्यायिका आहे.
Powered By Sangraha 9.0