स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी टिप्स

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |
xm_1  H x W: 0


काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही. हीच गोष्ट विद्यार्थी वर्गाने जर स्वत:ला लागू केली तर अभ्यासाचा ताण तयार होणार नाही ह्या उलट त्याची मजा तयार होईल. 


तुम्ही हजर राहणे आवश्यक 
वर्गात उपस्थित राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. शिक्षक विषय समजावून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत, अशा पद्धतीने विषय समजून देतात. तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्हीही प्रश्न विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता, खरंतर तो विद्यार्थ्यांचा हक्कच आहे. आळस म्हणून, कंटाळा आला म्हणून वर्गाला गैरहजर राहू नका. यश मिळवण्यासाठी नियमितता प्रचंड महत्वाची असते. 

लक्षपूर्वक ऐका 
वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं, डोळ्यांनी ते सर्व समजून घेणे व बुद्धीने ते ग्रहण करणं आवश्यक आहे. यालाच एकाग्रचित्ताने ऐकणं म्हणतात. ते तुम्ही किती टक्के करता त्यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे. शिक्षक काय समजून सांगत आहेत, ते लक्षपूर्वक ऐकत चला. 

समजून उमजून शिका
जे पाहिलं, ऐकलं, ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणं याला मनन म्हणतात. मन ही एक अशी कोठी आहे की, त्यात किती भरत गेले तरी ते पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती आहे की, ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते. नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. मनाची दुसरी एक अशी शक्ती आहे की ते सारख्या सारख्या विरोधी, जुन्या-नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते, त्याला चिंतन म्हणतात. जे पाहिलं, ऐकलं, वाचलं त्याचं असं सतत मनन-चिंतन सरू ठेवावं. त्याला वेळकाळाचं बंधन नाही. मनात ही प्रक्रिया सतत चालू असते. नवीन ज्ञान प्राप्त झाले की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरू करावी. 

लेखन
लेखनाने माणूस पक्का होतो. महत्त्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत. थोडक्यात नोट्स काढणं, सुसंगत लिहिणं ही कला आहे. पण ती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. सुवाच्य लिहिणं हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिले तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात असा अनुभव आहे. परीक्षा तर लेखीच होते. त्यामुळे लेखन भरपूर झालं पाहिजे. झालेलं लेखन तपासून, चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्सची परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत होते. 

चर्चा करा
केलेल्या अभ्यासावर तुमच्या मित्र मैत्रिणींशी नक्की चर्चा करा. चर्चेमुळे विषय समजण्यास आणखी मदत होते. कधी कधी आपल्याला चुकीची संकल्पना समजलेली असते. तर चर्चेतून आपल्याला ती कळू शकते तसेच आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला जर काही समजले नसेल तर आपण ते समजावून सांगू शकतो; त्यामुळे आपल्याला जे समजलं आहे ते अधिक पक्कं होण्यास मदत होते. चर्चेतून अभ्यासाची उत्सुकता वाढते, निकोप स्पर्धा देखील तयार होते. 

सातत्य  
वरील सर्व पायऱ्यांमध्ये सातत्य असावं. अभ्यास याचा अर्थच सातत्य असा आहे.. विनोबांनी म्हटलंय की अन्न जसं पचवावं लागतं तसं ज्ञानसुद्धा क्षणाक्षणांनी व कणाकणांनी मिळवून पचवावं लागतं. सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे. तो नक्की करा आणि यश मिळवा. 

वाचन कराच
वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे. अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. असं म्हणतात ऐकलेले विसरू शकतो. पण वाचलेलं आठवतंच. वाचनाच्या अनेक पद्धती आहेत. दुसऱ्याला त्रास होणार नाही इतक्या आवाजात मोठ्याने वाचन करणे चांगले. चुका कमी होतात. विषय समजावून घेताना मूक-वाचन करा. महत्त्वाच्या भागावर खुणा करा. उजळणी करताना किंवा नोट्स काढताना याचा फायदा होतो.