आज ५ जून! जागतिक पर्यावरण दिन. युनो जनरल असेंब्लीमध्ये ५ जून १९७२ मध्ये जागतिक पातळीवर पर्यावरण दिवस साजरा करावा, असा ठराव करण्यात आला. त्या ठरावानुसार ५ जून १९७३ पासून हा दिवस जगभर पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने साजरा केला जातो. या वर्षीचा पर्यावरणाचा विषय आहे.... Celebrate Biodiversity म्हणजेच जीवांना वाचवा. वृक्ष, पाणी, सागर, निसर्ग, नद्या या सर्वच ठिकाणी आज कमालीचे प्रदूषण आढळून येते. लाखो वृक्षांची कत्तल दररोज जगाच्या पाठीवर होत असून, त्यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडला आहे. निसर्ग प्रदूषणयुक्त करण्यात आज मानवाचाच मोठा सहभाग आहे.
गेली कित्येक दिवस कोरोना या साथीरोगामुळे सर्व देशांत लॉकडाऊन होते. या काळात कारखाने बंद होते. रस्त्यांवर वाहने नव्हती. त्याचा परिणाम नद्या स्वच्छ राहण्यात झाला. गंगा नदीचे पात्र अगदी प्रतिबिंब दिसावे इतके स्वच्छ झाले. आज प्रत्येक वर्षी जग ५ ट्रिलियन प्लॅस्टिक बॅग्ज वापरत आहे. आज हवा, पाणी व अन्न या गोष्टी अशुद्ध व पर्यावरणाला घातक ठरत आहेत. आपणा भोवतालचे नदी, नाले पाहा. पूर्वी ते खळखळून वाहत असत. आज त्यांचा प्रवाह आटला आहे. नदीवर अनेक ठिकाणी वाहते स्रोत बंद होऊन जलपर्णीचे थर साचले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी सांडपाण्याचे नाले नदीत मिसळून नद्या जणू सांडपाणी वाहणाऱ्या गटारगंगा झाल्या आहेत. भयंकर वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील तापमान वाढत चालले आहे. पृथ्वीवरील पशुपक्ष्यांच्या दुर्मीळ जाती नष्ट होत आहेत. प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे सागरकिनारे सांडपाण्यांनी व प्लॅस्टिकनी भरून चालले आहेत. दरवर्षी सुमारे १३ मिलियन टन्स प्लॅस्टिक समुद्रात जाते. साहजिकच याचा मासे व विविध जलचर प्राण्यांना आपले जीवन जगताना त्रास होत आहे.
शुद्ध हवा मिळेनाशी झाली आहे. भारतातील ११ शहरे सर्वांत जास्त प्रदूषित आहेत. दिल्लीसारख्या शहरात तर श्वसनाचे त्रास लहान मुलांना जाणवत आहेत. दिल्लीत सम-विषम अशा तारखांना वाहने चालवावी लागत आहेत. प्रचंड वाहनांमुळे माणसांना वारंवार ट्रॅफिक जामसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिल्ली तो बहुत दूर है. आपल्या पुण्यात तर माणसांच्या संख्येपेक्षाही वाहने जास्त आहेत. तापमान वाढीमुळे अनेक शहरे पाण्याखाली जाण्याचाही धोका पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. पाणी, हवा व अन्न यांसारख्या मूलभूत गरजा जर माणसाला सहजासहजी व शुद्ध अवस्थेत मिळाल्या नाहीत, तर त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल. यासाठी त्यास निसर्गाची व पर्यावरणाची कास धरावी लागेल.
शांताराम वाघ,
मोशी प्राधिकरण, पुणे
मो. ९६२३४५२५५३