ऑफिसला जा; पण जपून

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |

office_1  H x W


संसर्गाचा धोका अद्यापही कायम


लॉकडाउन दरम्यानच्या काळात ऑफिस बंद होती, काही जण घरातूनच ऑफिसचे काम करत होते. मात्र, आता बहुसंख्य ऑफिस आणि व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपापल्या ऑफिसांमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार श्वासोच्छ्वासाची गती वाढेल, अशी कामे केली, तर कोरोना शरीरात प्रवेश करण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऑफिसला जाताना धावपळ टाळा. श्वासोच्छ्वासाची गती केवळ दोन मिनिटांसाठीही वाढली, तरी डोक्यातील ऑक्सिजनची पातळी ४० टक्क्यांनी कमी होते. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार वेगाने श्वासोच्छ्वास केल्याने शरीराच्या पेशींमधील ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइडचे संतुलन बिघडते.  

ऑक्सिजनची पातळी कमी झाली, की पेशींकडून उर्जेची निर्मिती कमी होते. त्यामुळे दम लागतो, थकवा येतो. दीर्घ श्वास घेणे आणि वेगाने श्वास घेणे, यांमध्ये फरक असतो; पण बहुतेकांना ही एकच गोष्ट वाटते. वास्तविक, दीर्घ श्वास घेणे ही एक कमावलेली क्रिया आहे. दीर्घ श्वासामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होते आणि रक्तदाबाची पातळी सामान्य स्तरावर येते. त्यामुळे तणाव निर्माण होणारे हार्मोन्स कमी होतात आणि चांगली झोप येते. शारीरिक मेहनतीची कामे करताना किंवा खेळताना अथवा व्यायाम करताना आपल्या श्वासाची गती वाढते. त्यामुळे जिथे माणसे कमी असतील आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जातील, तेथेच कामे करा अथवा व्यायाम करा. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार वेगाने श्वास घेतल्यामुळे कोरोना विषाणूला मानवी शरीरात प्रवेश करणे सुकर होते. म्हणजे, आपला श्वास वेगाने सुरू असेल आणि आपण बाधिताच्या संपर्कात आलो असू, तर धोका अधिक वाढतो.

सुरक्षित वावर गरजेचा 
घरातून बाहेर पडताना मास्क घालणे जरुरीचे असून, पायी चालणार असाल, तर अन्य व्यक्तींपासून सहा फूट लांब राहा. इतरांपासून लांब चालत असाल, तर आपोआपच चालण्याचा वेग सामान्य राहील. श्वास वेगाने घेतला जाणार नाही. ऑफिसला किंवा कामाच्या ठिकाणी जाताना वेळेच्या पुरेसे आधीच निघा. म्हणजे गडबड होणार नाही. जाताना इयरफोन लावू नका. लिफ्टचा वापर शक्यतो टाळा. गरज असेल, तर लिफ्टचे बटण हाताने दाबण्याऐवजी कोपराने दाबा.