या कॅफेमध्ये प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यावर एक टोपी आहे, तिला प्लॅस्टिकच्या हलक्या नळ्या जोडलेल्या आहेत. या नळ्यांची तीन टोकं तीन दिशांना बाहेर पडतात. ही प्रत्येकाची हद्द. तिच्या आत यायचं नाही, तेवढं अंतर एकमेकांत राखायचं, असा सोपा हिशोब आहे.
कोरोनाकहरामध्ये देशाचं नेतृत्व कसं नसावं, याची अनेक उदाहरणं आसपास दिसतायत. विश्वाचं नेतृत्व करायला निघालेल्या अनेक नेत्यांना कोरोनाचं गांभीर्यच कळलं नव्हतं आणि त्यांनी प्रसाराच्या धोक्याच्या काळात त्यांनी प्रचारकी महासोहळे आयोजित करून कोरोनाबाधेला हातभारच लावला. मात्र, जर्मनीच्या नेत्या अँजेला मर्केल यांचा खंबीरपणा या काळात अनुभवायला मिळाला लोकांना. त्यांच्या वेगवान उपाययोजनांमुळे जर्मनी लवकर पूर्वपदावर येतो आहे. तिथला जीवनव्यवहार पूर्ववत होतो आहे.
हा फोटो आहे स्वेरिन नावाच्या शहरातला. तिथे रॉथ श्वेरीन नावाचा एक कॅफे पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनामुळे लादलेल्या टाळेबंदीचा काळ संपलेला आहे, काळजी मात्र कायम घ्यावी लागणार आहे, अशा वातावरणात यापुढे रेस्तराँ, हॉटेल किंवा कॅफे उघडायचं ठरवलं तर पुढे काय करावं लागेल, ते इथे दिसतंय. एकतर या कॅफेमध्ये आतल्या बाजूला बसण्याची व्यवस्थाच ठेवण्यात आलेली नाही. ग्राहकांनी फुटपाथवर (अर्थातच सरकारच्या परवानगीने) ठेवलेल्या खुर्च्यांवरच बसायचं आहे, तिथेच त्यांना खाद्यपदार्थ मिळतील. तिथे लोकांनी एकमेकांपासून किती सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे तेही इथे कुणी सांगत बसत नाही. प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यावर एक टोपी आहे, तिला प्लॅस्टिकच्या हलक्या नळ्या जोडलेल्या आहेत. या नळ्यांची तीन टोकं तीन दिशांना बाहेर पडतात. या नळ्या ही प्रत्येकाची हद्द. तिच्या आत यायचं नाही, तेवढं अंतर एकमेकांत राखायचं, असा हा सोपा हिशोब आहे.