कोरोनानंतरच्या जगात, भविष्यात पार्ट्या, सोहळे, उत्सवच कमी होणार असतील तर असंख्य लोक बेरोजगार होतील, त्यात डीजेचा समावेश असेल. त्याने गवंडीकाम सुरू केलं तर काय होईल, ते या भिंतीच्या रूपाने दिसतंय.
लॉकडाऊन संपल्यानंतरचं आपलं जग हे लॉकडाऊनच्या आधीच्या जगापेक्षा फारच वेगळं असणार आहे. आपण जेव्हा टाळेबंदीत प्रवेश केला होता, तेव्हा आपल्याला ती आठदहा दिवसांची सुट्टी वाटली होती. त्यानंतर सगळं जग पूर्ववत होईल आणि नेहमीप्रमाणे चालू लागेल, असं आपल्याला वाटत होतं. पण आता हळूहळू करोनाने घडवलेले परिणाम लक्षात येतायत. करोनाच्या विषाणूचा नि:पात करून मानवजात सुखाने नांदू लागली, असं काही एकदम होणार नाही.
कोरोना काही पृथ्वीवरून किंवा आपल्या देशातून हुसकावला वगैरे जाणार नाही. तो आता पृथ्वीवर कायमचा रहिवासी असणार आहे. एखाद्या महायुद्धात मरतात तेवढी माणसं त्याने आधीच मारून झालेली आहेत, तरीही तो आपल्यासोबतच असणार, हे गृहीत धरून यापुढे वावरावं लागणार आहे. त्यामुळे जिथे माणसं एकत्र येतात, असे सोहळे, समारंभ, सभा, कार्यक्रम यापुढे कशा पद्धतीने होतील, हे सांगता येणं कठीण आहे.
इथे गंमतीखातर उदाहरण दिलंय ते डीजेंचं. डीजे एकही गाणं सरळ वाजवत नाही, तो त्यात काय काय मिसळतो आणि मागेपुढे फिरवून ते चक्रम बनवतो. भविष्यात पार्ट्या, सोहळे, उत्सवच कमी होणार असतील तर असंख्य लोक बेरोजगार होतील, त्यात डीजेचा समावेश असेल. त्याने गवंडीकाम सुरू केलं तर काय होईल, ते या भिंतीच्या रूपाने दिसतंय. इथे सरळ विटांची भिंतच नाही, वेड्यावाकड्या आडव्यातिडव्या विटा लावून भिंत रचलेली आहे.