पावसाळा म्हणजे झाडे लावण्याचा आदर्श ऋतू

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |


rainy_1  H x W:


पावसाळ्यात वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. सगळीकडे हिरवागार होऊन जाते. हे सगळं शक्य होतं ते झाडांमुळे. बागकाम करणारी मंडळी तर ह्या ऋतूत अतिशय उत्साहात असतात कारण पावसाळा हा झाडे लावण्याचा आदर्श ऋतू समजला जातो.


१.  पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो. वृक्ष लावताना योग्य झाडाची निवड केली पाहिजे. वड, पिंपळासारख्या वृक्षामध्ये प्रदूषण कमी करण्याची व हवा स्वच्छ करण्याची भरपूर ताकद आहे. पण शहरात पुरेशी जागा नसते. शहरात दुतर्फा लावण्यासाठी सप्तपर्णी, तामण, कडुलिंब, कांचन, आसूपालव, बकुळ, अशोक हे वृक्ष लावावे. यावर चिमण्या घरटे बांधतात. उन्हाळ्यात थंडावा वाटतो.

२. मंदिराचा परिसर व स्मशानाजवळ वृक्षारोपण करावे. बेल, गुलमोहर, रेन ट्री, जास्वंद, प्राजक्त ही झाडे लावावीत. घराच्या अंगणात सीता अशोक, कडुलिंब, कारंज, बदाम, समुद्रफळ, पाम, सातवीन, तामण, नागकेशर, अर्जुन ही वनौषधी झाडे लावा. मोकळ्या जागांवर गुंज, मधुवासी, मेहंदी, हिरडा, बेहडा, आवळा, शंकासुर, अडुळसा ही झाडे लावा.

३. वृक्षांचे औषधी उपयोग अनेक आहेत. खरफ वृक्षाची साल उपयोगी असते. दात साफ ठेवण्यासाठी, मुखरोग, खोकला, त्वचा विकारात उपयोगी आहे. खदिरादिवटी हे औषध होते. रिठा वृक्षाचे फळ उपयुक्त आहे. केश्य योग हे औषध करतात. हे वेदनाशामक असून सूज कमी करते. अर्धशिशी, दमा, खोकला यात वापरतात. त्वचारोगात वापरतात. 

४. भोकर वृक्षाची साल व फळे उपयोगी असतात. त्याचा फलमोरंबा हे औषध करतात. ते पित्तशामक असून अतिसारात उपयोगी पडते. सीताफळ फार गोड असते. त्यांच्या बियांपासून बीजचूर्ण हे औषध तयार करतात. बीजचूर्ण केसातील उवा घालवते. शिसम वृक्षाचे काळा शिसम व पांढरा शिसम असे दोन प्रकार आहेत, पानांपासून पत्ररस हे औषध करतात. 

५. सुरंगी वृक्षाची फुले सुवासिक असून औषधी आहे. त्यापासून रक्तस्तंभक योग हे औषध तयार करतात. ही औषधे अतिसार, मूळव्याधीत उपयोगी पडते, पाटला किंवा पाढळ वृक्षाची फुले व साल उपयोगी असते. त्याच्यापासून दशमूलासव हे औषध करतात. याचा उपयोग जखम बरी करण्यासाठी करतात. ते वातपित्तशामक आहे. 

६. रायआवळापासून मोरंबा तयार करतात. तो पित्तशामक असून त्यामुळे पोट साफ राहते. गुग्गुळ वृक्षाच्या खोडातील चीक औषधी असतो. त्यापासून त्रिफळा गुग्गुळ हे औषध तयार करतात. 

७. चिंच वृक्षापासून चिंचापानकफ औषध करतात. चिंच भूक वाढविण्यास उपयोगी असते. शोष (तोंड कोरडे पडते) कमी होते. पित्त वाढवते म्हणून अ‍ॅसिडिटीत घेऊ नये. हिरडा वृक्षातील फळापासून त्रिफळाचूर्ण करतात. पोट साफ होते. कफ कमी होतो. वातशामक. उत्तम दन्तमंजन होते. तुम्ही घरी रोपे तयार करून ती टेकडीवर लावू शकता.