कोराडीत उभारणार पथदर्शी ऊर्जा शैक्षणिक पार्क

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |


nagpur_1  H x W

नितीन राऊत यांची माहिती : नागपूरला बनवणार पर्यटनाचे हब 


देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीच्या असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडीत ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहनविरहित बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवण्याचा मानस असल्याचे नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. 

महावितरणच्या ऊर्जा अतिथीगृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कोराडीत ऊर्जा पार्क प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याने कोराडीत ऊर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून शिक्षण मिळावे, त्यांना ऊर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी हाताळता यावेत, सोबतच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने हा ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे.

या सर्व प्रकल्पांचा आराखडा प्राथमिक अवस्थेत असून, निधीची तरतूद करून हे प्रकल्प साकारण्याचा मानस डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. या प्रस्तावित प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण प्रसिद्ध वास्तूरचनाकार अशोक मोखा यांनी केले. सादरीकरणानंतर माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, रमण विज्ञान केंद्राचे संचालक विजय शंकर शर्मा यांची मते जाणून घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती शैला ए., महाऊर्जा संचालक सुभाष डुंबरे, नेहरू विज्ञान केंद्राचे सूर्यकांत कुळकर्णी, अशोक जोगदे, रवी बनकर यांनी आपली मते मांडली.