प्रत्येक एसटीत फक्त २० वारकऱ्यांनाच परवानगी मिळाली
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहुतून, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीतून आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटीने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटीत २० जणांना बसण्याची परवानगी असून, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जूनला दशमीला मार्गस्थ होणार आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा साध्या पद्धतीने होत आहे. अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १२ आणि १३ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, त्या मूळ मंदिरांत ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन्ही संतांच्या पादुका पंढरपूरकडे एसटीने की हेलिकॉप्टरने नेणार, याबाबत निर्णय होत नव्हता.
पुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, संत तुकाराम महाराज संस्थान तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूरला पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी देण्यात आली असून, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना जाता येणार नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.