अनेक गोष्टींवर गूळ हा सोपा, स्वस्त उपाय

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |


jugry_1  H x W:


वजन कमी करण्यासाठी :
गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे. त्यात आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी जतन करून ठेवण्याची सवयसुद्धा गुळाने मोडण्यास मदत करते व आपले वजन कमी होते. 

रक्ताची शुद्धी : नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. 

पचनक्रिया चांगली : गूळ आपल्या पचनशक्तीची ऊर्जा वाढवतो व त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गूळ अवश्य खावा कारण त्यावेळी शरीराची पचनक्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गूळ हा रामबाण उपाय आहे.

ऊर्जास्रोत : साखर फक्त गोडवा देते. गुळात मात्र नैसर्गिक गोडवा जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात. 
 
गूळ हाडांसाठी चांगला : गूळ आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. दूध आणि गूळ हे एकत्रित हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे.

रक्ताक्षय टाळतो : गुळात प्रचंड प्रमाणात लोह आहे. तो खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून येते. त्याच्या सेवनाने लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते व अशक्तपणा जाणवत नाही. थकवा आणि ऊर्जेची कमतरता असे विकार गूळ खाल्ल्याने होत नाहीत. 

सर्दीखोकल्यावर गुणकारी : सर्दीखोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गुळमिश्रित गरम पाणी प्यायल्याने आराम पडतो. रात्री झोपण्यापूर्वी गुळ खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

 
स्त्रियांसाठी उपयुक्त : मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गूळ खूप गुणकारी आहे. त्याच्या सेवनाने सर्व दुखणे कमी करण्यास मदत होते. ओटीपोटातील दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर गूळ हा सोपा आणि स्वस्थ उपाय आहे. 

त्वचा आणि केसांचे आरोग्य : सुंदर लांबसडक आणि चमकदार केसांसाठी गुळाचे सेवन अवश्य करा. जीवनसत्वे आणि खनिजे यांनी भरलेला गूळ त्वचेवर छान चमक आणतो. मुरूम व डाग नाहीसे करण्यास मदत करतो.