भूमिकेसाठी वाट्टेल ते

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |
niraj _1  H x W


शिप ऑफ थिसीयस या सिनेमासाठी नीरज काबीने १७ किलो वजन घटवलं होतं. तो जैन मुनी मैत्रेय ही व्यक्तिरेखा साकारत होता. रोगावर उपचार करणं ही हिंसा असेल म्हणून ते टाळतो आणि खंगत जातो, हे दाखवण्यासाठी नीरजने ही जोखीम पत्करली.   


जुन्या काळात सिनेमातल्या नायकांचं वजन वाढणं सहजशक्य असायचं. वय वाढलं की वजन वाढलेलं दाखवायचं. पॅडिंग करून हे काम केलं जायचं. वजन घटवण्याचा काही प्रश्नच नव्हता. खात्यापित्या घराची अन्नान्नदशा झाली तरी ते अभिनयातून आणि चेहऱ्यावर खंगलेपणा दाखवणारी काळी वर्तुळं रंगवून चालवलं जायचं. आताच्या काळात व्यक्तिरेखाही गुंतागुंतीच्या असतात आणि त्यांच्यासाठी अभिनेते वजन वाढवणं आणि घटवणं हेही करतात. आमीर खानने गजनीपासून हा ट्रेंड आपल्याकडे सुरू केला. मात्र, त्याचं सगळ्यात धक्कादायक उदाहरण होतं नीरज काबी. 
 
शिप ऑफ थिसीयस या सिनेमासाठी त्याने १७ किलो वजन घटवलं होतं. या कथानकात तो जैन मुनी मैत्रेय ही व्यक्तिरेखा साकारत होता. त्याला जडलेल्या रोगावर उपचार करणं ही हिंसा असेल म्हणून ते टाळतो आणि खंगत जातो, असा क्रम दाखवण्यासाठी वयाच्या ४२व्या वर्षी नीरजने वैद्यकीय सल्ला झुगारून अवघ्या सहा महिन्यांमध्ये १७ किलो वजन घटवलं आणि जिवावरची जोखीम पत्करून अक्षरश: छातीचा पिंजरा दिसू लागेपर्यंतची अवस्था गाठली. त्याचवेळी तत्त्वज्ञानाचं वाचन सुरू होतंच. हॉलिवुडमध्ये हीथ लेजरने अजरामर करून ठेवलेला जोकर साकारण्याची संधी जोकिम फिनिक्सला मिळाली तेव्हा त्याने त्या भूमिकेचा आत्मा गवसावा म्हणून तब्बल २३ किलो वजन घटवलं. काही वेळा गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेची भावस्थिती समजण्यासाठी तिच्या शारीरिक अवस्थेपर्यंत पोहोचावं लागतं, तेव्हा तिचा प्राण गवसतो.