मुंबई पालिकेचा इशारा : आज संध्याकाळपर्यंत माहिती देण्याचे निर्देश
कोरोनामुळे रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची माहिती महापालिकेला देण्यासाठी खासगी रुग्णालयांना अंतिम संधी देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत (२८ जून) संध्याकाळी पाचपर्यंत माहिती न कळविल्यास साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती महापालिकेला ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जूनला पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले होते. त्यानंतर काही खासगी रुग्णालयांनी माहिती दिली, तर काही रुग्णालयांनी दिलेली नाही. याबाबत पालिका आयुक्तांनी वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, व डॉक्टरांसोबत पालिकेच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यात आयुक्तांनी हे निर्देश दिले.
पालिकेच्या रुग्णालयांत व उपचार केंद्रांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घ्यावी. टोसिलिझुमॅब, रेमेडेसिव्हिर यांसारख्या आवश्यक औषधांचा महिन्याभर पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर करावा. संबंधित औषधे तयार करणाऱ्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून औषधे थेट घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कार्यवाही करावी, असे निर्देशही आयुक्तांनी बैठकीत दिली.