काम करताना झूम फटिग येणारे तुम्ही एकटेच नाही...

Sandyanand    27-Jun-2020
Total Views |


z_1  H x W: 0 xलॉकडाऊनच्या काळात व्हिडिओ चॅटिंगच्या माध्यमातून आपण सगळ्यांबरोबर संपर्कात राहू शकलो. सहकारी, वरिष्ठांबरोबरच्या बैठका झूमच्या माध्यमातून होत होत्या, अजूनही होत आहेत. पण अशा बैठका लांबल्यास मानसिक थकवा येत असल्याचे आढळले आहे. त्यालाच सध्या झूम फटिग असे नाव आहे.


लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते; पण अनेक जण घरून काम करत होते. त्यासाठी अर्थातच इंटरनेटची मदत होत होती. सहकारी आणि वरिष्ठांबरोबर बैठक घेण्यासाठी झूमने खूप मदत केली. पण त्याचा अतिरेक झाल्यावर तोटेही दिसायला लागले. सलग व्हिडिओ मीटिग्जमुळे मानसिक थकवा येणे हा त्यातील एक आहे. दीर्घकाळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर बसल्याने मेंदू थकतो आणि डोळ्यांवरही ताण पडतो. त्यामुळे शरीरही त्रास देऊ लागते.

कशामुळे होते हे याचे तज्ज्ञांनी केलेले हे विश्लेषण. व्हिडिओ चॅटिंग करताना संबंधित व्यक्तीला अनेक अवधाने सांभाळावी लागतात. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोलावे लागते, आवाजावर नियंत्रण ठेवावे लागते आणि शरीराचा तोलही सांभाळावा लागतो. हे सगळे एकाच वेळी करताना मेंदूवर ताण पडतो, असे तज्ज्ञ म्हणतात.

समोरासमोर बैठक सुरू असताना बोलणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द बारकाईने ऐकण्याची गरज नसते. पण व्हिडिओ मीटिंगमध्ये तुमचे सगळे लक्ष एकाच जागी केंद्रीत होते आणि मीटिंग लांबत गेल्यास त्याचा त्रास होतो. अपवाद वगळता आपण नेहमी शांतपणाने एकमेकांबरोबर बोलतो. पण व्हिडिओ मीटिंगमध्ये कधी कधी आवाज वाढू शकतो आणि त्याचा त्रास होतो. व्हिडिओ मीटिंगमध्ये अनेक जण सहभागी झालेले असतात आणि ते तुमच्याकडे सतत बघत असतात.

त्यामुळे अवघडल्यासारखे होते व काहीवेळा लक्ष लागत नाही. शिवाय दुसऱ्यांचे बोलणे ऐकण्यातच वेळ जास्त जातो. व्हिडिओ मीटिंग सुरू असताना तुमचा चेहरा स्क्रीनवर झळकत असतो आणि त्यामुळे तुम्ही जास्त अवघडता किंवा सावध होता. अनेक लोक आपल्याकडे पाहत असल्याचे दिसत असल्याने ताण येऊन त्याचा दबाव तुमच्या सादरीकरणावर पडतो. अशी मीटिंग म्हणजे जणू तुमच्यासमोर ठेवलेला मोठा आरसा असतो, अशा शब्दांत लॉरा डडले या संशोधिकेने या स्थितीचे वर्णन केले आहे.