कोरोनामुळे महिलांच्या करिअरचा मार्ग खडतर

Sandyanand    27-Jun-2020
Total Views |

rt_1  H x W: 0

घरातून काम करणाऱ्या महिलांवर आहे तिप्पट बोजा
लॉकडाऊननंतर घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या
साथीनंतर रोजगाराची स्थिती कशी असेल हे सांगणे कठीण स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलले जात असले, तरी स्त्रियांचा करिअरचा मार्ग आजही खडतरच आहे. घर आणि मुलांची जबाबदारी घेऊन तिला करिअरची वाट चालायची असते. अनेक ठिकाणी पुरुषी वर्चस्वामुळे गुणवत्ता असूनही महिलांना संधी मिळत नाही. त्यात भर पडली आहे ती कोव्हिड- १९ च्या साथीची. साथीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून, मंदीचे संकट येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत महिलांचा करिअरचा मार्ग जास्तच अवघड झाला आहे.
सध्याचा काळात स्त्री-पुरुष समानतेवर बरेच बोलले जाते. महिलांनाही प्रगतीचा हक्क आहे, त्यांना संधी मिळायला हवी वगैरे भाषणे सुरू असतात. महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. उद्योग सुरू करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून व्याजदरात सवलत दिली जाते. काही जागा खास महिलांसाठी ठेवल्या जातात. पण प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते. 
महिलांनी घराचा उंबरठा ओलांडू नये अशी अनेकांची मानसिकता आहे. स्त्रीला घराबाहेरच धोका असल्याचे कारण त्यासाठी दिले जाते. लक्ष्मणरेषा न ओलांडणे हाच स्त्रीच्या सुरक्षेसाठी निकष मानला जातो. पण आजची स्थिती पाहिली तर तो भ्रम असल्याचे सिद्ध होते. भारतातील गुन्हेगारीबाबत २०१८मध्ये प्रसिद्ध झालेला अहवाल धक्कादायक आहे. बलात्कारासारखा घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांमध्ये कुटुंबाचे मित्र, शेजारी, एम्प्लॉयर, ऑनलाइन मित्र आणि लिव्ह इन पार्टनर यांचे प्रमाण ९४ टक्के असल्याचे हा अहवाल सांगतो. म्हणजे, हे गुन्हेगार संबंधित महिलांच्या परिचयातील होते, तरी त्यांनी गुन्हे केले. 
लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातच महिलांकडून येणाऱ्या तक्रारी दुप्पट झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नमूद केले आहे. घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुट्रेस यांनीही चिंता व्यक्त केली आहे. संधी मिळाली म्हणून संबंधित महिला तक्रार करू शकल्या हे लक्षात घ्या. तक्रारीची संधी मिळत नसल्याने किती महिला घरगुती हिंसाचाराशी झुंजत असतील याची कल्पनाच करता येत नाही. 
निवारागृहांची अपुरी संख्या आणि पाठिंब्याची यंत्रणा नसल्यामुळे हिंसाचाराबरोबर महिलांना सामना करावा लागतो. नक्की किती महिलांना छळाला सामोरे जावे लागते याची आकडेवारी नसली, तरी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, एक तृतियांश विवाहित महिलांचा सासरी काही ना काही स्वरूपात छळ होतो. यात पतीकडून मारहाण होण्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. मात्र, घरगुती छळापासून महिलांचे रक्षण करणारा कायदा (प्रोटेक्शन ऑफ वूमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स अ‍ॅक्ट-२००५) आता कडक झाल्याने त्याला थोडा आळा बसला आहे. 
या कायद्यात छळाचे चार प्रकार स्पष्ट करण्यात आले आहेत. शारीरिक, लैंगिक, वाचिक (व्हर्बल) आणि भावनिक (इमोशनल). एका छोट्या घरात अनेकदा खूप लोक राहत असतात. तेथे खासगीपणाला थोडीसुद्धा जागा नसते. त्यातच काकाकाकू, चुलत आणि मामे भावंडे यांच्यातही अनेकदा वाद असतात. ज्येष्ठ आणि दिव्यांगांकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकार छळातच येतात. घरातील महिलेला मारहाण करण्याचा प्रकारही घडतो. पण तक्रारीला जागा नसल्याने तिला सहन करावे लागते अशा ठिकाणी शांतपणाने सगळे सहन करण्याशिवाय स्त्रीला गत्यंतर नसते. पण आश्चर्य म्हणजे, अनेक महिलांनी या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. 
काही ना काही कारणांमुळे त्यांना तो योग्यच वाटतो! अर्थात, हिंसाचाराला विरोध करणाऱ्या महिलाही असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. युद्ध किंवा एखाद्या मोठ्या संकटात लैंगिक गुन्हे वाढतात. पण सध्या लिंगाधारित (जेंडर बेस्ड) गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सोबत कोणी नसलेले एखादे मूल घराकडे येत असताना त्याचे अपहरण होण्याची शक्यता जास्त असते. अनैतिक कृत्यासाठी हे अपहरण होते. 
कोरोनाच्या साथीत त्याने किंवा तिने जोडीदार गमावला असेल, रोजंदारीवर निर्वाह अवलंबून असताना पदरी तीन मुले असतील आणि मुलीसाठी जीवनसाथी शोधायचा असेल, तर स्थिती जास्त बिकट होते. लॉकडाऊनचे परिणाम प्रत्येक क्षेत्रावर वेगवेगळे झाले आहेत. सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना बसला आहे. अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेकींना कामावर जाणे बंद करावे लागले. 
अनेक जणींना पगार घेता आला नाही आणि काही जणींचे स्टॉल बंदच आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे केवळ महिलांनाच त्रास होतो आहे. असे म्हणता येत नाही. कारण पुरुषही तणावात आहेत. साथीनंतर काय हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. या स्थितीत महिलांना करियरची संधी कितपत मिळणार. असा प्रश्न केला जातो. आजही घरात सहसा कर्त्याचे स्थान पुरुषाचे असते. महिला कमावती असली, तरी तिचे स्थान दुय्यम मानले जाते. त्यामुळे साथीनंतरच्या जगात रोजगारात कोणाला किती संधी मिळेल, हे सांगणे तूर्त कठीण आहे.