प्लाझ्मा थेरपीच्या आमिषाने दिल्लीत अनेकांची फसवणूक

27 Jun 2020 12:40:13




प्लाझ्मा डोनेशन स्कॅम उघडकीस

टाळूवरचे लोणी खाणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचा अनुभव नुकताच राजधानी दिल्लीत आला. कोरोना विषाणू बाधा झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा उपचाराने बरे करण्याचे आमिष दाखवून एका ठगाने अनेक महाभागांना फसवल्याचे समोर आले असून पोलिसांनी संबंधित संशयिताला अटक केली आहे.

साथीचे संकट दूर होण्याआधी देशाच्या काही भागात प्लाझ्मा डोनेशन स्कॅम झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अशा लोकांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. दिल्लीत अशा फसवणुकीला चक्क विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल बळी पडले असून त्यांनी काही रक्कम संबंधित संशयिताच्या खात्यात जमा केल्याचे दिसून आले.

बहुतेक वेळा सोशल मीडियाचा वापर करून रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना जाळ्यात पकडले जाते असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. अब्दुल करीम असे संशयिताचे नाव असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आजारातून बरे झालेल्या लोकांनी आणि हॉस्पिटल्सनी प्लाझ्मा दान करावा आणि सरकारला कळवावे असे आवाहन केले जात होते आणि फसवले जात होते.

फसवले गेलेल्यात आम आदमी पक्षाचा सदस्यही आहे. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे आरोपी भासवत होता; तसेच आपण आजारातून बरे झालो असेही सांगत होता. त्याच्या बतावणीला काही लोक बळी पडले आणि त्यांनी रक्कम त्याच्या खात्यात भरली. हॉस्पिटलमध्ये ये जा करण्यास रक्कम हवी असे तो सांगत असे आणि रक्कम मिळाल्यावर पळून जात असे. गोयल यांनी त्याची खातरजमा करताच अब्दुलने फोन बंद केला. नंतर २० जून रोजी पोलिसात तक्रार दिल्यावर त्याचा माग काढून पकडण्यात आले. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने किती जणांना फसवले आहे याचा शोध घेतला जात आहे.
Powered By Sangraha 9.0