काही क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

Sandyanand    27-Jun-2020
Total Views |


no_1  H x W: 0


दूरसंचार, निर्मिती आणि शैक्षणिक क्षेत्रात नोकऱ्या मिळणे शक्य


कोरोनाच्या साथीमुळे थंडावलेले अर्थचक्र हळूहळू वेग घेऊ लागले असून, काही क्षेत्रांत नोकऱ्याही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. साथीच्या काळात कामगार कपातीमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना पुन्हा रोजगाराची संधी मिळणे हे चांगले चिन्ह मानावे लागेल.

कोरोनाच्या साथीपूर्वी अर्थव्यवस्थेची गती फार नसल्याने रोजगाराची संधीही कमी होती. आता मात्र काही क्षेत्रे आणि काही पदांवर संधी मिळत असल्याचे औद्योगिक जगतातील सूत्रांनी नमूद केले. अर्थात, सध्याची माहिती अगदी प्राथमिक असली, तरी एज्युटेक,
ई-कॉमर्स, डेटा प्रोसेसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, बँकिंग, आरोग्य, विमा तसेच औषधनिर्माण क्षेत्रांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना साथीपूर्व काळातील रोजगाराचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घटले होते. तेच प्रमाण आता निम्म्यावर आल्याची माहिती रोजगारविषयक सीआयईएल एचआर या कंपनीचे प्रमुख आदित्य मिश्रा यांनी दिली. सध्या काही क्षेत्रांत रोजगाराच्या संधी असल्या, तरी पर्यटनासारख्या क्षेत्रात सध्या त्या नाहीत, असे ते म्हणाले.

जूनअखेरपर्यंत रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध होतील. मात्र, हवाई वाहतूक, पर्यटन आणि आदरातिथ्याच्या क्षेत्रात संधी मिळायला आणखी काही काळ जावा लागेल, असा अंदाज रॅनस्टॅड इंडियाचे एक अधिकारी संजय शेट्टी यांनी व्यक्त केला. दूरसंचार आणि निर्मिती या दोन क्षेत्रांतही आगामी काळात संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रातही रोजगार वाढतील, असे त्यांचे मत आहे.