मल्टिटास्किंगच्या नादाला लागू नका

Sandyanand    26-Jun-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
अनेकांना एकाच वेळी अनेक कामे करायची सवय असते. त्यामुळे आपण अष्टपैलू आहोत, असा त्यांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.
 
जे लोक सतत गडबडीत असतात, धावत असतात ते कधीच कोठे पोहचत नसतात, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी म्हणत असत. त्यांचे हे वाक्य किती खरे आहे याची प्रचिती आता नव्या अभ्यासावरून येत आहे. एकावेळी अनेक कामे करणे म्हणजे भूषणावह मानणारी नवी पिढी प्रत्यक्षात एकही काम पूर्ण करू शकत नाही असे यात पुढे आले आहे. सध्याचे युग हे धावपळीचे झाले आहे असे आपण नेहमी ऐकतो. सतत स्पर्धा, पुढे जाण्यासाठीची धडपड यामुळे अनेक जण एकाचवेळी अनेक कामे करतात. जीवनच इतके वेगवान आहे की असे करण्याशिवाय पर्याय नसतो. अशी कामे करणाऱ्यांना कार्यालयात बढती मिळते. भरभक्कम पगारही मिळतो. मात्र या कथित अष्टपैलूत्वापासून सावध राहावे असा धोक्याचा इशारा सॉल्ट लेक सिटीमधील उटा विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी दिला आहे. एकाच वेळी अनेक कामे करणाऱ्यांना म्हणजेच मल्टिटास्किंग केल्यामुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे या प्राध्यापकांच्या लक्षात आले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात हे आढळले असून त्यांनी त्याचे निष्कर्ष समोर आणले आहेत.
 
अनेकांना एकाच वेळी अनेक कामे करायची सवय असते. त्यामुळे आपण अष्टपैलू आहोत, असा त्यांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. उदाहरणार्थ गाडी चालवताना फोनवर बोलणारे लोक अविचारी, काहीतरी सनसनाटी निर्माण करण्याच्या प्रतीक्षेत असतात. त्यांच्या गाडीला अपघात होण्याची शक्यता बरीच जास्त असते. असे असले तरीही अनेक व्यक्तींना एकाच वेळी दोन ते तीन गोष्टी करण्याची सवय असते. ही सवय त्यांच्यासाठी उत्तेजक, आव्हानात्मक आणि अधिक रोमहर्षक असते. मात्र त्यामुळे त्यांच्या एकूणच कामावर परिणाम होतो. विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर, उतावीळपणा आणि सनसनाटीपणा यांच्याशी सख्य असलेले विद्यार्थी चांगले अष्टपैलू नसतात, असेही संशोधकांना आढळले. अभ्यासादरम्यान पदवीपूर्व विद्याथ्र्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे मल्टिटास्किंगचे कौशल्य तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल सत्तर टक्के विद्यार्थी स्वतःला उत्तम मल्टिटास्कर समजत होते. त्यांच्या मते ते इतरांपेक्षा उत्तम काम करत होते. प्रत्यक्षात त्यांचे कौशल्य इतरांपेक्षा कमी आढळून आले. त्याउलट जे विद्यार्थी उत्तम अष्टपैलू असल्याचे आढळून आले ते प्रत्यक्षात एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देत होते. कामावरील लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहता येणारे पंचवीस टक्के विद्यार्थी या गटात होते.