
डिजिटल स्वाक्षरी प्रिस्क्रिप्शनद्वारे औषधोपचार; हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषांमध्ये सल्ला
देशातील जनतेला कोरोनाचे उपचार सहजपणे उपलब्ध व्हावेत, त्यांना सर्वोत्कृष्ट डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला यांचा लाभ डिजिटल स्वरूपात घेता यावा, या हेतूने आरोग्यसेवा क्षेत्रातील शंभराहून अधिक तज्ज्ञांनी एकत्र येऊन स्वस्थ या नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. कोरोना साथीच्या काळात जनतेला टेलि-मेडिसीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व निष्णात तंत्रज्ञांनी हा स्वस्थच्या रूपाने प्रतिसाद दिला आहे.
राज्यांच्या भौगोलिक सीमा आणि जनतेचे उत्पन्नाचे स्तर यांच्या पलिकडे जाऊन परवडण्याजोगी आरोग्यसेवा पुरविण्याची
सुविधा या मोबाईल अॅपमध्ये आहे. स्वस्थमुळे नोंदणीकृत वैद्यकीयअधिकारी व रुग्ण यांच्यात व्हिडिओ व दूरध्वनी यांच्या माध्यमातून सुरळीतपणे, दूरस्थपणे संवाद प्रस्थापित होईल.
रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे, हे पाहून त्याला कोणते उपचार द्यावयाचे, याचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे करण्यात येईल आणि त्यानुसार डिजिटल स्वाक्षरी असलेल्या प्रिस्क्रिप्शनद्वारे औषधोपचारांची योजना व तसा सल्ला रुग्णांना देण्यात येईल. मोफत सल्ला देण्याबरोबरच, रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी मदत, त्यांच्या आजाराचे निदान, औषधोपचार, तसेच रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता व त्यांच्या नोंदणीची व्यवस्था आदी सेवा देखील स्वस्थमधून अल्पदरांत देण्यात येणार आहेत.
स्वस्थ प्लॅटफॉर्मवर नेमण्यात आलेल्या सर्व डॉक्टरांची व्यवस्थित पडताळणी झालेली आहे. त्यांना टेलि-कन्सल्टेशन देण्याचे व कोविड-१९ च्या वैद्यकीय उपचारांविषयीचे खास प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.आरोग्यसेवांच्या प्लॅटफॉम्र्ससाठीचे, उद्योगांमध्ये मान्यताप्राप्त असे, सायबर सुरक्षेचे सर्व निकष स्वस्थ्यासाठी पाळण्यात आले आहेत.
अॅपमधील डेटाचे प्रसारण,त्याची साठवणूक, व्यवस्थापन व हाताळणी या बाबीसुरक्षितपणे व्हाव्यात, याकरीता डिफेन्स-इन-डेप्थ ही पद्धत वापरण्यात आली आहे. या अॅपमधून सध्या हिंदी,इंग्रजी व गुजराती या भाषांमध्ये सल्ला देण्यात येत आहे आणि लवकरच ही सेवा इतर २५ भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात येईल.
स्वस्थ हा ना-नफा तत्वावरील प्रकल्प आरोग्यसेवा प्रदाते, आंत्रप्रीनर्स, कुशल तंत्रज्ञ व डॉक्टर्स यांनी निर्माण केला. कोरोना उद्रेकाविरुद्ध लढणाऱ्या स्टार्टअप उपक्रमांना पाठबळ देणारे गुंतवणूकदार व आंत्रप्रीनर्स यांच्या एसीटी ग्रँट्स या प्लॅटफॉर्ममधून स्वस्थला १० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.