संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस, काम न करण्याचा दिवस, शाळा, कॉलेज, ऑफिसला न जाण्याचा दिवस, फिरण्याचा, एन्जॉय करण्याचा दिवस. सर्वांना आवडणारा संडे म्हणजे सुट्टीचा दिवस हा रविवारच का असतो? त्यामागची गोष्ट काय ते जाणून घेऊया. भारतीयांना पहिली रविवारची सुट्टी मिळाली होती ती १० जून १८९० रोजी. नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने सहा वर्षे यासाठी संघर्ष केला. रविवारच्या सुट्टीचा इतिहास खूप रंजक आहे. आपल्या देशात पूर्वी कोणतीच सुट्टी नव्हती. मग शनिवारी तेल आणू नये, सोमवारी केस कापू नये, या मान्यतेनुसार त्या त्या व्यवसायाला आपोआप सुट्टी मिळायची. औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी नावाचा प्रकार आला. तेव्हा साप्ताहिक सुट्टीची गरज भासू लागली.
१८५४ मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली, नंतर नागपूर, कानपूर, चेन्नई इथे कापड गिरण्या सुरू झाल्या. कमी पगार, जास्तीचे कामाचे तास, सुट्टी नाही, विश्रांतीला वेळ नाही अशी स्थिती होती. नंतर फॅक्टरी अॅकट लागू झाला. पण त्यातही फक्त बालकामगारांना आठवड्याची सुट्टी होती, महिला व प्रौढ कामगारांना नव्हती. या विरोधात पहिला आवाज उठवला तो रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ साली फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. यात आठवड्यात एक दिवस सुट्टी सकाळ ते संध्याकाळ ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्या होत्या. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, तरी लोखंडेंनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी सर्व कामगारांची सभा घेण्यात आली व त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर झाला. सुट्टीचा हा ह्नक नारायण लोखंडे यांनी भारतीयांना मिळवून दिला. भारतात रविवार हाच सुट्टीचा दिवस का ठरला हे आपण जाणून घेऊ. भारतात तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्याने ख्रिश्चनधर्मियांनी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस जाहीर केला. चर्चमधील प्रार्थनांसाठी या सुट्टीचा उपयोग होईल या हेतूने. त्यामुळे तेव्हापासून रविवार हाच सार्वजनिक सुट्टीचा वार ठरला.