देशातील वाहन उद्योगाचा चेहरा मोहरा आता बदलणार

Sandyanand    31-May-2020
Total Views |
vehicle_1  H x


कोरोनामुळे छोट्या-मोठ्या सर्वच उद्योगांना जबर फटका बसला आहे. याला वाहन उद्योगही अपवाद नाही. परंतु कोरोनाचा प्रभाव दूर होऊन लॉकडाऊन उठल्यावर वाहन उद्योगाचा चेहरा-मोहराच बदलून जाईल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान कारच्या विक्रीपासून उत्पादन ठप्प आहे. याचा प्रतिकूल परिणाम आगामी दिवसात विक्री आणि वितरणाच्या बाबतीत दिसणार आहे. 

कार उत्पादक कंपन्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी ऑनलाइन विक्रीवर भर देत आहेत. कारचा विमा, सर्व्हिसिंग, टेस्ट ड्राइव्ह इ. संदर्भातसुद्धा मोठे बदल पाहायला मिळतील. तसेच कार डीलरशिप आणि शोरूम नव्या स्वरूपात दिसणार आहेत. ऑटो उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे असे की, वाहन कंपन्यांना डीलरशिपची गरजच भासणार नाही असे नाही, पण काम करण्याच्या पद्धतीत नक्कीच बदल होईल. एकाच मोठ्या प्रशस्त शोरूमऐवजी छोटे छोटे शोरूम दिसतील. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झाल्यानंतर काही महिने लोक नव्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेण्यासाठी कचरतील; परंतु असे जास्त दिवस होणार नाही. 

गाड्यांची विक्री ऑनलाइन असेल किंवा शोरूममधून असेल; पण टेस्ट ड्राइव्हचे प्रचलन बंद होणार नाही. कोरोना संकटामुळे बेरोजगार झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे. यामुळे गाड्यांची विक्री कमी होण्याची शक्यता आहे. कारण लोक आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यालाच प्राधान्य देतील, पण एक मात्र नक्की की, कोरोनामुळे ऑनलाइनचे महत्त्व वाढले आहे. याचा फायदा विमा कंपन्या व सर्व्हिस देणारे डीलरसुद्धा घेतील. विमा कंपन्यांचे बहुतेक कामकाज ऑनलाइन सुरू झाले आहे. अ‍ॅपद्वारे विमा काढण्यापासून ते क्लेमची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर डीलरसुद्धा ऑनलाइन माहिती देण्याची तयारी करीत आहेत.