महाराष्ट्राची ओळख सक्षम राज्य म्हणून होईल

Sandyanand    31-May-2020
Total Views |
mah_1  H x W: 0 


सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभर हाहाकार माजला आहे. कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार थांबवण्यासाठी जवळपास सर्वच देशांत लॉकडाऊन स्थिती आहे. सर्व व्यापार उद्योग बंद आहेत. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. 


'वर्क फ्रॉम होम' कार्यपध्दतीमुळे सर्व कंपन्यांचा खर्च कमी होऊन शेवटी नफा वाढेल. महाराष्ट्रात कॉम्प्युटरचे ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा कंपन्या महाराष्ट्रभर सुरू होतील. 


अमेरिका, इटली, स्पेन यासारख्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. परंतु, आपल्या देशात कोरोना थोडा उशिरा आल्याने आपणावर इतरांपेक्षा कमी प्रभाव आहे. त्यातही महाराष्ट्र या कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रावर भविष्यात काही सकारात्मक परिणाम घडतील. येत्या काळात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र एक सक्षम राज्य म्हणून ओळखला जाईल. याची काही कारणे आहेत. 

 • महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम होणार नाही व ती मजबूत होत जाईल. कारण मुंबई, पुणे सारख्या शहरांप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत कोरोनाचा तितका प्रसार नाही, त्यामुळे नवीन उद्योग वाढतील. 

 • इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सुशिक्षित तरुणांची संख्या अधिक आहे. मराठी तरुण हे इंजिनीयरिंग, वैद्यकीय, आयटी यांसारख्या क्षेत्रात कुशल आहेत. त्यामुळं अनेक मोठ्या कंपन्या येतील. 

 • आपल्या लोकांमध्ये आपल्याच राज्यात निर्मित होणाऱ्या उत्पादनांबाबत जनजागृती होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्याच राज्याअंतर्गत चलनवलन वाढेल. आपला पैसा आपल्याच राज्यात राहील. महाराष्ट्रातील उत्पादनांना देशाच्या इतर भागातही मागणी वाढेल. यात शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. 

 • जूनपर्यंत गंभीर महामारीतून मुक्त होणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य असू शकेल. याचे मुख्य कारण म्हणजे इथले उन्हाळ्यातील अति उष्ण हवामान व मराठी माणसांची उच्च रोगप्रतिकार शक्ती. 

 • जगभरातील देश चीनवर हळूहळू बहिष्कार टाकतील व चीनप्रमाणे एक मॅन्युफॅक्चरिंग सुविधा स्थापित करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली जाईल. अमेरिका, जपान हे देश आधीच चीनमधून बाहेर पडले आहेत. आता भारत व मुख्यत: महाराष्ट्रसुध्दा मोबाईल स्माटफोन्स ते फार्मा उत्पादने अशा प्रत्येक वस्तूचे निर्मिती केंद्र भविष्यात बनेल. 

 • जगातल्या बलाढ्य व सर्वोत्तम ब्रँडसना भारतातील विशेषत: मराठी लोकांचा प्रामाणिकपणा, मेहनती स्वभाव, प्रतिभा व विश्वासार्हता कळेल. यामुळे आपोआप महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. 

 • आपल्या शाकाहारी अन्नपदार्थांना महत्त्व येईल. त्यातही ऑरगॅनिक अन्नपदार्थांना जास्त मागणी वाढेल. त्यामुळे ऑरगॅनिक शेती करण्याचे प्रमाण वाढेल. 

 • विदेशी लोक पर्यटन, स्वच्छ व आरोग्याला पोषक वातावरण, अध्यात्म व आयुर्वेदिक उपचारांसाठी महाराष्ट्रात येऊ लागतील. 

 • आपल्या वैद्यकीय सुविधांची सहज उपलब्धता वेगवान व मौल्यवान कार्यक्षमतेबद्दल कौतुक केले जाईल व जगभर त्यांची मागणी वाढत जाईल. 

 • आयुर्वेद व निसर्गोपचार लोकप्रिय होतील. त्यामुळे योग व प्राणायाम शिकवणाऱ्या शिक्षकांना मोठी मागणी असेल. परदेशात राहणारी बुद्धिमान, हुशार मराठी माणसे परत येतील. कारण उत्पादन क्षमता व 'मेक इन इंडिया' सारखे उपक्रम वाढल्यास त्यांना योग्य वेतनाच्या नोकऱ्या सुध्दा उपलब्ध होतील. 

 • २०२० भारताच्या दृष्टीने जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्पा असेल. इथून पुढे सर्व जग भारताने दाखवलेल्या समृध्द मार्गाने जाईल यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असेल. हे चित्र आपल्या महाराष्ट्राच्या आशादायी व स्वप्नवत परिस्थितीचे आहे. लवकरच महाराष्ट्र हे भारताचे सर्वांत समृध्द व वैभव संपन्न राज्य बनेल. याचा लाभ येथील तरुणांनी घेतला पाहिजे व वाहत्या गंगेत हात धुवून घेतले पाहिजेत.  


- प्रकाश भोसले