हरियाणाच्या ११०० गावांमध्ये 'कोव्हिड वाटिका' तयार करणार

31 May 2020 12:28:04




कोविड-१९ (कोरोना) व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हरियाणा राज्यातील ११०० गावांमध्ये २४ प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करून 'कोविड वाटिका' तयार करण्यात येणार आहे. या वनस्पती औषधांचा काढा लोकांची इम्युनिटी वाढविणार आहे. कोविड वाटिकांच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून ५०-५० गावांची निवड करण्यात आली आहे.

गावातील लोकांना या कोविड वाटिका दाखवून लोकांनी घराच्या अंगणात किंवा शेतात कोविड वाटिका तयार करावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या कोविड वाटिकेत तुळस, कढीपत्ता, आवळा, चिंच, बेल, जांभुळ इ. वृक्षांचाही समावेश आहे. लोकांना या २४ प्रकारच्या औषधी वनस्पतींची रोपे नर्सरीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधी वनस्पतींपासून काढा तयार करण्याची माहिती देण्यात येईल. कारण हा काढा माणसाच्या शरीरातील इम्युनिटी (रोग प्रतिकार क्षमता) वाढविण्यासाठी उपयु्क्त आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

वनविभागाचे कर्मचारी गावोगाव फिरून या कोविड वाटिकेची माहिती देणार आहेत. ग्रामपंचायतसुद्धा गावात कोविड वाटिका तयार करू शकेल. या वाटिकेतून लोकांना औषधी वनस्पतींची रोपे मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी हरियाणा वन विभागाने लाखो रोपटी तयार केली आहेत. मान्सूनपूर्वी या रोपांची लागवड करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती हरियाणाचे वनमंत्री कंवरपाल गुर्जर यांनी दिली. 
Powered By Sangraha 9.0