चित्रपटात काम करण्यासाठी म्हणून मुंबईत आलो. पण, कामच मिळेना. फुटपाथवर राहिलो. कोलकात्याला परत जाऊ शकत नव्हतो आणि इथे कामही मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. रात्री झोपायचं कुठे..? हा तर रोजचाच प्रश्न होता. मग माझ्या एका मित्रानं मला मुंबई जिमखान्याची मेंबरशिप मिळवून दिली, जेणेकरून सकाळी निदान आंघोळ करून आवरायला तरी मला कुठेतरी जागा मिळावी.
जिमखान्यातच आवराआवर करून मी काम शोधण्यासाठी बाहेर पडत असे. हे लक्षात आलं की, संकटं येतच असतात. पण संघर्ष केल्याशिवाय, लढल्याशिवाय यश मिळत नाही. क्रिकेट, फुटबॉल यासारख्या खेळांमुळे माझ्यातली ती संघर्ष करण्याची इच्छा कायम ठेवली होती. त्यामुळे मी स्वतःच्या रंगाच्या पलिकडे जाऊन स्वतःचा शोध घेतला. मला हे माहिती होतं की मी चांगला नाचू शकतो आणि मार्शल आर्ट करु शकतो. त्यामुळे माझ्या रंगाकडे लोकांचं लक्षच जाणार नाही, असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे, असा विचार केला आणि मग यश मिळालं.
सुरक्षा हा माझा चित्रपट त्या अर्थानं उपयोगी ठरला आणि लोकांनी माझी दखल घ्यायला सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत गोऱ्या-गोमट्या कलाकारांचा बोलबाला होता. त्याकाळी मी सावळा रंग घेऊन पडद्यावर येण्याचा प्रयत्न करत होतो. मी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन रितसर अभिनयाचं शिक्षण घेऊन आलो. तरीही, माझ्या रंगामुळे खूपच त्रास झाला. मृणाल सेन यांनी मला कुठल्याशा कार्यक्रमात पाहिलं आणि मृगया नावाचा चित्रपट दिला. त्यात मी नायक होतो. ती भूमिकाच आदिवासी होती. त्यात मी त्वचेचा रंग आणि फिटनेस, यामुळे फिट बसलो. तोच पुढे माझा यूएसपी झाला.