महाराष्ट्र दिनी १ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश प्रकाशित

03 May 2020 11:54:17



मराठीतील वेगवेगळ्या शब्दकोशांतील सुमारे १ लाख ६८ हजारांहून अधिक शब्दांचे संकलन असलेल्या बृहद् कोशाचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण करण्यात आले. या बृहद्कोशात एखादा शब्द शोधल्यास अनेक शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळतील. त्याबरोबर, त्या शब्दाशी संबंधित शब्दही मिळतील. त्यामुळे मराठी भाषा अभ्यासक, भाषाप्रेंमीसाठी हा बृहद्कोश विशेष उपयुक्त ठरणार आहे. 

मराठीतील शब्दकोशांना सुमारे दोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोल्सवर्थ, कँडी, दाते, कर्वे अशा अनेकांनी मराठी शब्दकोशांची निर्मिती करून भाषा समृद्ध केली आहे. तसेच, मर्यादित व्याप्ती असलेले किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेले (माधव ज्युलियन यांच्या फारशी-मराठी कोशासारखे) अनेक कोशही आहेत. मराठीतले हे समृद्ध कोशवाड्मय विविध ग्रंथांत विखुरले आहे. कोशांचे काही प्रमाणात संगणकीकरण झालेले असले, तरी हे सर्व कोश वेगवेगळ्या संकेतस्थळांवर काही संस्थांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ पाहायचा असेल, तर हे वेगवेगळे कोश तपासून पाहावे लागतात. एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता येत नाही. ही उणीव दूर करण्याचा उद्देश बृहद्कोश प्रकल्पातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आदूबाळ, प्रसाद शिरगावकर आणि ऋषिकेश खोपटीकर यांनी हा बृहद्कोश प्रकल्प साकारला आहे. 

बृहद्कोश हा नवा शब्दकोश नसून हे अनेक कोशांचं एकत्रित ऑनलाइन संकलन आहे. येत्या काळात अधिकाधिक शब्दकोश बृहद्कोशाअंतर्गत संकलित करण्याची योजना आहे. समशब्दकोशासारखे किंवा पारिभाषिक कोशासारखे कोशही कालांतराने जोडले जातील. प्रकाशित कोशांच्या संकलनाबरोबर इंटरनेटमुळे मराठीत झालेले बदल टिपणारा कोशही प्रकाशित करायचा मानस आहे. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. बृहद्कोश प्रकल्प कोणत्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी चालवलेला नाही. बृहद्कोश सर्वकाळ मुक्त आणि विनामूल्य उपलब्ध राहील, असे आदूबाळ, प्रसाद शिरगावकर आणि ऋषिकेश खोपटीकर यांनी सांगितले. बृहद्कोशासाठी https://bruhadkosh.org या दुव्याचा वापर करावा.
Powered By Sangraha 9.0