खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून तसेच फळे आणि मधापासून मिळणारी प्रेक्टोज शुगर टाळली, तर फक्त एका आठवड्यात पचनशक्ती वाढू शकते आणि लठ्ठपणा, लिव्हरमध्ये चरबी जमा होणे, मधुमेह यासारख्या आजारापासून मुक्ती मिळू शकते, असा दावा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील टोऊरो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांनी असे प्रतिपादन केले आहे की, ७५% पॅक्ड (डबाबंद) फूड व पेय, सोडा आणि केकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्टोज असते. प्रेक्टोज एकप्रकारची शुगर असून, ती फळे आणि मधापासून मिळते. प्रेक्टोज साखरेपेक्षा स्वस्त पण २०% जास्त गोड असते. यामुळे डबाबंद खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ तयार करताना प्रेक्टोज शुगरचा सर्रास वापर करतात; पण हे प्रेक्टोज शरीरात पोहोचताच चरबीमध्ये परिवर्तीत होते. यामुळे शरीराचे वजन वाढून शरीर लठ्ठ बनते. या शास्त्रज्ञांनी १८ वर्षांच्या ४० मुलांच्या आहारातून शुगरयुक्त पदार्थ पूर्णपणे काढून टाकले.
एक आठवड्यानंतर असे आढळून आले की, या मुलांच्या शरीरात उच्च कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले व त्यांची चयापचय प्रक्रिया सुधारली व शरीराचे वजनसुद्धा नियंत्रित झाल्याचे प्रतिपादन प्रो. ज्यामार्क स्वार्ज यांनी केले आहे. यामुळे आरोग्य निरोगी राहावे यासाठी डबाबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेय टाळावेत. सॉस, जॅम, जेली शक्यतो घरीच तयार करावेत. डबाबंद पदार्थांमध्ये प्रेक्टोज शुगरचा खाद्य आणि पेयांमध्ये पोषणवर्धक आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर करतात.