स्पर्धा परीक्षांत यशासाठी गणित, इंग्लिश यांच्यावर प्रभुत्व हवे

27 May 2020 12:59:35


कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी गणित, इंग्लिश, तर्कशास्त्र हे महत्त्वाचे विषय आहेत. या विषयांची भीतीच असंख्य विद्यार्थ्यांना असते. ही भीती दूर कशी करावी याविषयी हा सल्ला...


आज कोणत्याही कोर्सची प्रवेश परीक्षा असो किंवा कोण्या जॉबसाठी लिखित परीक्षा, जवळजवळ सर्वच ठिकाणी अर्जदारांची संख्याशास्त्रीय क्षमता, तर्कशास्त्र आणि भाषा प्राविण्य यांची विशेष प्रकारे तपासणी केली जाते. कॅट, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, बीबीई एंट्रन्स, एसएससी जॉब्स इत्यादी अशी अनेक प्रमुख उदाहरणे आहेत, जेथे अर्जदारांना आपली योग्यता या विषयांशी निगडीत प्रश्न सोडवून सिद्ध करावी लागते. तुम्ही जरी गणित पदवीपर्यंत शिकले नसेल तरीही किंवा मग इंग्रजीशी तुमचा संबंध दहावीनंतरच सुटलेला असेल, तरीही आजच्या स्पर्धेच्या वातावरणात सामान्य गणितीय संख्यामोड आणि इंग्रजीमध्ये चांगले प्राविण्य असेल आणि त्याबरोबरच चांगली तार्किक क्षमता असेल तर तुम्ही आपले कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. 

आधी निराशा सोडा : 
हे शक्य आहे की, तुम्ही दहावीनंतर गणित आणि इंग्रजी शिकू शकला नसाल पण त्याचा अर्थ हा नाही की, या स्पर्धा परीक्षांमधील अंकशास्त्र तसेच भाषा प्राविण्य याच्याशी संबंधित प्रश्न तुम्ही सोडवू शकणार नाहीत. आपल्या मनात याची जाणीव ठेवा की, या प्रश्नांचा स्तर दहावीचा असतो. म्हणून जर तुम्ही पुढच्या इयत्तांमध्ये या विषयांचा अभ्यास केला नसला तरीही त्रासाचे काही कारण नाही. स्वत:ला समजावून सांगा की, तुम्ही या विषयांचा अभ्यास नव्याने सुरू करून आपल्या मागील अभ्यासाची उजळणी करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी गणित एक भीतीदायक विषय असतो. कारण ते त्याच्या सुरुवातीच्या सिद्धांतांवर प्राविण्य बनविल्याशिवायच समीकरणे पाठ करण्याचा प्रयत्न करतात. गणितावर आपली पकड बळकट करण्यासाठी इयत्ता तिसरीच्या पुस्तकांपासून सुरू करून पुढे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला सिद्धांत, समीकरणे समजतील. 

वेग येईल :
जेव्हा तुम्ही लहान इयत्तांच्या पुस्तकांचा चांगला अभ्यास कराल तेव्हा, तुम्हाला समीकरणे पाठ करायची गरज भासणार नाही. इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांमध्ये दिलेले सँपल पेपर्स सोडवा. त्यांना सातत्याने सोडविल्याने तुमचा वेग विकसित होईल. 

अभ्यास करावा लागेल : 
भाषा प्राविण्यात तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ, वाक्यात उपयोग, विरुद्ध शब्द, अशुद्धशुद्ध यांच्याशी निगडीत प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी केवळ शब्दाचे पाठांतर करू नका. तर त्याचा योग्य उपयोग याविषयीही माहिती घ्या. इंग्रजीतील पुस्तके आणि वृत्तपत्रे यासाठी उपयोगी ठरू शकतात.
इंग्रजी: आता परकी नाही : 
एक काळ होता जेव्हा इंग्रजीतील थोड्या मजकुराला पाहून मराठी, हिंदी माध्यमातून शिकलेले लोक घाबरत असत. पण आज मोबाइल, इंटरनेट यांच्यात जवळपास सर्वच काम इंग्रजीत होत आहे. अशा वेळी लोकांना इतकी अडचणही येत नाही. इंग्रजीच्या भीतीला घालविण्यासाठी लहान इयत्तांमधील पुस्तकांपासून सुरूवात करा.
Powered By Sangraha 9.0