द रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडिजमधील निष्कर्ष जीवनात एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीत असाल, तर सरळा नाणेफेक करून, म्हणजे नाणे हवेत उडवून छापा की काटा या पद्धतीने निर्णय घ्या. तुमचा निर्णय जास्त अचूक ठरेल!
केवळ अचूकच नव्हे, तर तो समाधानकारक असल्याचे सहा महिन्यांत तुम्हाला अनुभवाला येईल. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. पळपुटे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी मैदान सोडत नाहीत हे आपण ऐकलेले असते. पण काहीवेळा महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होते. अशावेळी नाणेफेकीतून केलेला निर्णय योग्य ठरू शकतो, असे शिकागो विद्यापीठाने केलेल्या पाहणीचे प्रमुख स्टिव्हन लेव्हिट यांचे म्हणणे आहे.
निर्णय न घेता नुसत बसून राहण्यापेक्षा हा उपाय करून पाहा, असे ते सांगतात. द रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडिज या नियतकालिकात त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. घर बदलावे की नाही, सध्याची नोकरी सोडावी का आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर ठाम निर्णय घेण्यास संशोधकांनी लोकांना सांगितले होते. त्यासाठी Freakonomics Experiments ही वेबसाईट तयार करण्यात आली होती. मी नोकरी सोडावी का, मी घर बदलावे का, मी त्याला किंवा तिला प्रपोज करावे का आदी प्रश्नांना लोकांनी उत्तरे दिली. लोकांनी त्यांचे प्रश्न तयार करावेत असेही सुचविण्यात आले होते. मी टॅटू काढावा का, मी ऑनलाइन डेटिंग करावे का आदी प्रश्न लोकांनी तयार केले होते. नाणेफेकीच्या साहाय्याने घेतलेले निर्णय जास्त योग्य असल्याचे अभ्यासात आढळले.