कलमांचे ढोबळमानाने सामान्यतः २ गट मानण्यात येतात. कलम करण्यास फक्त वनस्पतीचा डोळाच वापरतात, तेव्हा त्याला डोळ्यांचे कलम वा डोळा बांधणे अशी संज्ञा वापरतात. अनेक डोळ्यांच्या फांदीचा भाग वापरल्यास त्याला कलम करणे म्हणतात.
काही झाडे बिया पेरून किंवा फांदी थेट कुंडीत लावून जगवता येत नाहीत. त्यांचे कंदही नसतात. अशा झाडांची लागवड कलमाद्वारे करावी लागते. कलम करणे हे कौशल्याचे काम आहे. ज्या झाडांच्या फांद्या जगत नाहीत, त्यांचे गुटी कलम (लेयर ग्राफ्टिंग) करतात. उदाहरणार्थ लिंबू, डाळिंब, पेरू इत्यादी. लागवड केलेल्या झाडाच्या जून फांदीवर हे कलम केले जाते. टोकाकडून साधारण एक-दीड फुटांवर फांदी कलम करतात. कलम करण्यात बियांपासून तयार केलेल्या रोपावर दुसऱ्या झाडाच्या डोळ्याचा अगर फांदीचा जोड जमवून तो जोपासावयाचा असतो. त्यामुळे एका झाडाच्या मुळावर दुसऱ्या झाडाचा विस्तार वाढविला जातो. मुळांचा भाग बनलेल्या भागाला खुंट आणि वरील विस्तार पुरविणाऱ्या भागाला कलम म्हणतात.
अशी कलमे काही विशिष्ट वनस्पतींमध्येच करता येतात. नारळ, केळी यांसारख्या एकदल वनस्पतींमध्ये कलमे करता येत नाहीत. आंबा, मोसंबी, चिकू, पेरू यांसारख्या द्विदल वनस्पतींमध्ये ती करता येतात. निकट संबंध असलेल्या प्रकारातील झाडांचा जोड लवकर जमतो. दूरवरचा संबंध असलेल्या झाडांचा जोड जमत नाही. वनस्पतिविज्ञान दृष्ट्या वनस्पतींची विभागणी कुलांत, कुलांची विभागणी वंशांमध्ये आणि वंशांची विभागणी जातींमध्ये करण्यात येते. एका जातीतील दोन झाडांमधील कलमाचा जोड चटकन जमतो, दोन निरनिराळ्या जातींतील पण एकाच वंशामधील दोन झाडांचे कलम चांगले जमते परंतु ते एकाच जातीतील दोन झाडांमधील कलमाप्रमाणे लवकर जमत नाही.
निरनिराळ्या वंशांमधील दोन वनस्पतींचे कलम घडवून आणणे फार कठीण असते. दोन विभिन्न कुलांतील दोन वनस्पतींचे कलम कधीच जमत नाही. आंबा आणि मोसंबी दोन विभिन्न कुलांतील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड कधीच जमत नाही. मोसंबी व कवठ निरनिराळ्या वंशांतील परंतु एकाच कुलातील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड जमतो, पण त्यापासून तयार झालेले झाड बरेच लहानखुरे राहते म्हणून अशा प्रकारची कलमे रूढ नाहीत. जंबुरी आणि मोसंबी विभिन्न जातींची आहेत परंतु ती एकाच वंशातील असल्यामुळे त्यांच्या कलमाचा जोड जमतो आणि कलमे यशस्वीपणे तयार करता येतात, त्यामुळे जंबुरीवर मोसंबीची कलमे बांधणे हा सामान्य प्रघात आहे.