केमिकल्सने पिकविलेल्या आंब्यापासून सावध राहा

13 May 2020 11:34:09



सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे; परंतु लॉकडाऊनमुळे यावर्षी बाजारात आंब्याची आवक कमी झाली आहे. असे असले, तरी आंब्याचे शौकीन लोक काहीही करून आंबे खरेदी करून घरी आणतात; पण सावधान. वरून पिवळा धम्मक दिसणारा आंबा भयानक आजारांचे माहेरघर आहे. कारण आजकाल केमिकल्सचा मारा करून पिकविलेले आंबे बाजारात आले आहेत.


आंब्याच्या हंगामाची लोक वर्षभर चातकासारखी वाट पाहत असतात. पूर्वी पाडाचा पिकलेला आंबा दिसला की, आंबे उतरवून गवतात आंब्याची अढी घालत असत. आंबा पिकला की, त्याचा सुगंधच भुरळ घालत असे; पण आजकाल या पद्धतीने नव्हे, तर निरनिराळ्या केमिकल्सचा मारा करून आंबे पिकवितात. हे आंबे आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. कारण या आंब्यामुळे नर्व्हज सिस्टीम खराब होतेच, पण कॅन्सर होण्याचाही धोका असतो. 

स्वस्त आणि मस्त; पण... स्वस्त आणि पिवळे धम्मक आंबे पाहून आंबे खरेदी करण्याचा मोह होणारच, पण लक्षात ठेवा तुम्ही कृत्रिमरित्या म्हणजे केमिकल्सद्वारे पिकविलेले आंबे घरी नेत आहात. या आंब्यासोबतच काही घातक आजारही आपण घरी घेऊन जातो. जी फळे केमिकल्सद्वारे पिकवितात त्यामुळे कॅन्सर होण्याचा किंवा नर्व्हज सिस्टीम खराब होण्याचा धोका असतो. कारण फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड एसिटीलान गॅस, कार्बन मोनोक्साईड, पोटॅशियम सल्फेट, इथिफॉन प्युट्रीजियन, ऑक्सिटोसिन इ. केमिकल्सचा सर्रास वापर करण्यात येतो. यामुळे स्कीन कॅन्सर, कोलन कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेन हॅमरेज, लिव्हर फायब्रोसिन आणि नर्व्हज सिस्टीमशी संबंधित प्राणघातक आजार होऊ शकतात. 

कसे ओळखाल? - आपण खरेदी करीत असलेली फळे केमिकल्सचा वापर करून पिकविलेली आहेत हे ओळखण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे की, केमिकल्सने पिकविलेल्या फळावर हिरवे पॅचेस पडलेले दिसतील. फळाच्या ज्या भागावर केमिकल लावलेले असते तो भाग पिवळा असेल; पण त्यात बारीक हिरव्या रेषाही दिसतील. फळे जर नैसर्गिकरित्या पिकविलेली असतील, तर हिरव्या रेषा दिसणार नाहीत. केमिकल्स वापरून पिकविलेला आंबा जर कापला, तर तो आतून पिवळा-पांढरा दिसेल. झाडावर पिकलेले फळ (आंबे, केळी, पपई इ.) संपूर्ण पिवळे असते. केमिकल्समुळे फळांच्या सालीचा रंग फक्त पिवळा होतो व आतील फळ मात्र कच्चे असते. केमिकल वापरून पिकविलेली फळे स्वादिष्ट लागत नाहीत. काही वेळा अशी फळे खाल्ल्यावर उलटी होणे, पोट दुखणे किंवा डायरियाचा त्रास होतो. त्यामुळे फळांचा वास घेऊनच फळे खरेदी करावीत. घरी आणल्यावर पाण्याने स्वच्छ धुवावीत. आंबा खाण्यापूर्वी कमीतकमी ५ मिनिटे कोमट पाण्यात ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने पुन्हा धुवून नंतरच आंबा कापून खावा किंवा रस बनवावा.
Powered By Sangraha 9.0