तुम्हाला शंभर वर्षे जगायचे आहे? वृत्तपत्र वाचा!

    12-May-2020
Total Views |

newspaper!_1  H

शंभर वर्षे जगणाऱ्या वृद्धांविषयी एक सर्व्हे अमेरिकेतील एका संस्थेने केला. त्यामध्ये अनपेक्षित निष्कर्ष आढळले. हे वृद्ध चालू घडामोडींशी निगडित असल्याचे दिसून आले. त्यासाठी ते वृत्तपत्र वाचत असल्याचे आढळले. तसेच रियालिटी टीव्हीही ते पाहत असल्याचे दिसून आले...

जर तुम्हाला कोणी सांगितले की, तुम्ही वृत्तपत्र वाचून किंवा चॅनलवर संगीत ऐकून दीर्घायुषी होऊ शकता आणि शंभर वर्षांपेक्षाही जास्त जगू शकता, तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण अमेरिकेतील एका संस्थेद्वारे केल्या गेलेल्या सर्व्हेच्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर हे सत्य आहे. जर आरोग्याच्या आवश्यक अशा दुसऱ्या इतर नियमांचे पालन करण्यात वृत्तपत्र वाचणे सुद्धा सामील केले तर हे मानले जाऊ शकते की, तुमचे वय कमीतकमी शंभर वर्षांपेक्षा जास्त असू शकते. खरेतर हा रिपोर्ट शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठतम नागरिकांची दिनचर्या आणि अनुभव यांवर आधारित आहे. 'एवर केअर' संस्थेने सुमारे १०० वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या १०० नागरिकांना भेटून त्यांच्या दीर्घायुषी असण्याच्या रहस्याची माहिती मिळाल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार त्या सर्वांमध्ये समकालीन घटना, घडामोडी यांच्याशी निगडित राहण्याची सामान्य प्रवृत्ती आढळते. 

१०३ वर्षे जगणारे जॉर्ज रीड, जे पूर्वी बेसबॉल खेळाडू होते, त्यांनी हे मान्य केले की, ममी दररोज वृत्तपत्र अगदी लक्षपूर्वक वाचतो. जगात घडणाऱ्या घटनांची ताजी माहिती मिळवितो. सर्व ज्येष्ठतम नागरिकांनी हे मान्य केले की, चालू बातम्यांबरोबरच ते फॅशनच्या जगातील बातम्याही मोठ्या आवडीने वाचतात. आणि नेहमी सकारात्मक दृष्टीने सर्व चिंतांवर विचार करतात. आपल्या भूतकाळाशी अवजड ठरणारे नाते ठेवत नाहीत. त्यांना रोजची ताजी माहिती गतिशील बनविते. म्हणून ते वृत्तपत्रांमधून सर्व माहिती घेत असतात. त्यांच्यामध्ये एकतृतीयांश वृद्ध असे आहेत, जे वृत्तपत्रांशिवाय रियॅलिटी टीव्हीचे शो पाहतात. तर २७ टक्के वृद्ध एमटीव्ही किंवा संगीताच्या कार्यक्रमांची मजा घेतात. एवर केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन मॅक यांनी मान्य केले की, त्यांच्या जीवनातील चालू काळाशी संबंधित राहण्याची इच्छा, आत्मविश्वास आणि आध्यात्मिकता यांच्यातील दृढ आवड त्यांना वृद्धावस्थेतील तणावांपासून मुक्त ठेवते.  

अमेरिकेतील जनगणना ब्यूरोच्या अनुसार आता या शैलीत अमेरिकेत शंभर वर्षे जगणाऱ्यांची संख्या सुमारे ८० हजार आहे. ज्यांची संख्या २०४० पर्यंत ५ लाख ८० हजार होईल. यासाठीच सरकार आतापासूनच त्यांना सुविधा देण्यासाठी योजना तयार करत आहे. पण भारतात मात्र अशा वृद्धांविषयी कोणीही गांभीर्याने विचार करू इच्छित नाही. काही तर स्वत:च इतके निराश आणि भूतकाळाशी निगडित असणारे असतात की, वर्तमानाशी संबंधित राहण्याची त्यांची इच्छा समाप्त होते. त्यांना इच्छेने किंवा इच्छेविरुद्ध मृत्यूची प्रतीक्षा असते. कोणत्याही शंभर पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीने टीव्ही किंवा वृत्तपत्रांमधून चालू घडामोडी, बातम्या यांची माहिती घेणे किंवा फॅशनच्या कार्यक्रमांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणे आपल्या समाजात उपहासाचा विषय होतो. येथील समाजात वृद्धांसाठी वानप्रस्थाची कल्पना करण्यात आली आहे. येथे उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, वृद्धांना जेव्हा कोणत्याही आधाराची गरज असते तेव्हा त्यांना कुटुंबात वेगळे केले जाते. खूप कमी कुटुंबांमध्ये वृद्धजनांना वृत्तपत्र वाचण्याचे स्वातंत्र्य असते. 

आपल्या समाजाला हे नकोच असते की, त्यांना वर्तमान काळाशी जोडून ठेवावे. काही काळापूर्वी अमिताभ बच्चनचा चित्रपट नि:शब्द प्रदर्शित झाला, तेव्हा भारतीय संस्कृतीचे स्वयंघोषित पहारेकरी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करून भाले घेऊन धावत सुटले. पण भारतीय संस्कृतीतच भीष्म पितामह यांनी आपल्या वडिलांना त्यांच्या आवडत्या स्त्रीशी विवाह करून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य स्वत: अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. आजच्या समाजात त्या वृद्धांसाठी वृत्तपत्र वाचण्याची व्यवस्थासुद्धा ओझे वाटू लागते. जर एवर केअरच्या रिपोर्टला मान्य करायचे ठरवले तर असे अविश्वसनीय वाटत नाही. कारण मेंदू नेहमी नव्या घटनांची माहिती घेऊन सक्रिय होतो. आणि विशेषत: अशी माहिती जी फॅशन, साैंदर्य किंवा जीवनातील सकारात्मक घडामोडींशी निगडित असेल, तर तिचा प्रभाव अधिक होतो. या संबंधांत वैज्ञानिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.