पुण्यात मेट्रो मार्गिकेच्या विस्तारास पालिकेची मान्यता

    01-May-2020
Total Views |

स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्ग वाढवण्यास मंजुरी : २३३ कोटी ७५ लाखांचा खर्च अपेक्षित
metro_1  H x W:

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारीकरणास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. हा विस्तारित मार्ग भूमिगत असून, त्यासाठी २३३ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. यातील वनाज ते रामवाडी ही मेट्रो मार्गिका संपूर्ण उन्नत असून, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मार्गिका पुण्यातील शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि शेतकी महाविद्यालयापासून स्वारगेटपर्यंत भूमिगत आहे. या मार्गिकेचे स्वारगेटच्या बाजूला कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी केली होती. 

त्यासाठी महामेट्रोला सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोट- डीपीआर) तयार करण्याची सूचना महापालिकेच्या स्थायी समितीने केली होती. महामेट्रोनेही त्याप्रमाणे सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेला सादर केला होता. उन्नत आणि भुयारी असे दोन्ही पर्याय आणि आर्थिक आराखडा महामेट्रोने दिला होता. त्याचे सादरीकरणही महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि महापौरांपुढे करण्यात आले होते. मात्र, महापालिकेने भुयारी मेट्रो मार्गिकेला प्राधान्य दिले असून, हे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

स्वारगेट-कात्रज हा साडेपाच कि.मी. चा मार्ग आहे. त्यासाठी एकूण ४२८३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून त्यासाठी हिस्सा मिळणार आहे. महापालिकेला त्यांच्या हिश्श्यापोटी २८३ कोटी ७५ लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. हा खर्च करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे. स्वारगेट-कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेवर एकूण तीन स्थानके असून, २०२८ पर्यंत या मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने या विस्तारित मार्गिकेला मान्यता दिली असली, तरी केंद्र आणि राज्य शासनाच्या मान्यतेनंतरच विस्तारित मेट्रो मार्गिकेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.