उत्खननात मिळालेल्या पुराव्यांनुसार विचार करायचा झाल्यास सर्वांत पुरातन चाक सुमेरियन संस्कृतीत असल्याचे आढळले आहे.
मानवाच्या विकासात महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे त्याने लावलेला चाकाचा शोध. आज जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर चाकाचा कोणता ना कोणता तरी उपयोग मानवाला होतोच. त्यामुळे चाक हे मानवी विकासातील क्रांतिकारक पर्व मानले जाते. अर्थात चाकाचा शोध कधी लागला याबबत कोणाचेही नक्की एकमत झालेले नाही. सध्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यांनुसार विचार करायचा झाल्यास सर्वांत पुरातन चाक सुमेरियन संस्कृतीत असल्याचे आढळले आहे. ते तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे मतदेखील संशोधकांनी वर्तविले आहे. अर्थात त्यापूर्वीही चाक अस्तित्वात होतेच असा अंदाज संशोधकच व्यक्त करतात. कदाचित आठ हजार वर्षांपूर्वीच चाकाचा शोध लागल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे.
चाकाचा शोध अचानक लागलेला नाही. त्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होत गेले आणि आजचे आधुनिक पद्धतीचे चाक अस्तित्वात आले. पहिल्या टप्प्यात एखादी जड वस्तू वाहून न्यायची असल्यास त्या जड वस्तूखाली झाडाचा गोल वासा ठेवला जात असे. ते वासे जसजसे गोल गोल पुढे जात तशी ती अवजड वस्तू पुढे जात असे. जेथून वस्तू पुढे जाते त्याखालील वासा काढून तो पुढे ठेवला जात असे. जगात आजदेखील कामगार अशा पद्धतीचा वापर करतात. पुढे माणूस झाडांच्या वाशांऐवजी रनर्सचा वापर करु लागला. त्या अनुभवातून मग आडव्या दांड्याच्या आसाची निर्मीती झाली. त्यानंतर आडव्या वाशाऐवजी उभ्या गोलाकार चाकाची जोड दिली गेली. यामुळे मानवाचे श्रम खूप आश्चर्यकारकरित्या कमी झाले.
त्यानंतर लाकडाच्या फळीपासून चाक तयार करण्याची कला मानवाने विकसित केली. पुढे प्राणी म्हणजे गोडा, बैल, याक ओढून नेत असलेल्या गाड्यांना चाके जोडली गेली, त्यानंतर लाकडाला लोखंडी पट्ट्या लावल्या गेल्या. त्यामुळे लाकडी चाकाची झीज थांबली. पुढे आजच्या आधुनिक काळात लाकडी चाकांची जागा रबरी चाकांनी घेतली. यातही रोज संशोधन होतच आहे. आज साध्या दुचाकी सायकलपासून ते अगदी विमानापर्यंत चाकांचा वापर होतोच. चाकांच्या या गतीवरच मानवाच्या विकासाची गती जोडली गेली आहे.