संगीतसेवक (भाग २)

09 Apr 2020 13:04:04
 

स्वामी या मोकाशींच्या मित्राला एरवी, ढोल वाजवण्याची कला अंगी असूनही, ढोल वाजवण्याचा आनंद मिळाला नसता. मोकाशींनी दहा वर्षं ढोलाचं ओझं सोसलं व आपल्या मित्राला आनंद मिळवून दिला. आम्हा वारकऱ्यांच्या कानावर टाळांचा आवाज, दिंडीचं म्हणजे वीणेचं वादन व हरिनामाचा गजर पडला की आम्हाला ब्रह्मानंद मिळतो!

तुकोबा म्हणतात, 'टाळघोळ सुख नामाचा गजर ।घोषे जयजयकार ब्रह्मानंदु ।। गरूडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिका ।। तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेचि वाटा ।।' वाद्यांची संगत हवी.' ओकांनी मोकाशींची नवी कमतरता पुढे आणली, 'परब, मोकाशींची कन्या बेबी सुरेल गाते. गोड आवाजामुळे बेबीचा विवाह मागणी घालून झाला. बेबीनं संगीताच्या सर्व परीक्षा दिल्या आहेत. तिचे संगीताचे वर्ग आहेत. मोकाशी, तुम्ही मुलीची शिकवणी लावा! उलटी गंगा वाहते का ते पाहा, मुलीकडून बापाला ज्ञान!' खाली मान घालून मोकाशी म्हणाले, 'ओक, शिकवणीचा काहीही उपयोग नाही, दगडावर रोप काय रूजेल? ढोल गळ्यात अडकवून दहा वर्षं, सर्व वाद्यं ऐकत हिंडलो, पण माझ्या गळ्यानं एकही सूर पकडला नाही. बेबीचा आवाज मधुर होता, म्हणून मी बेबीच्या मागं लागलो, 'बेबी गाणं शीक. आईनं तुला सांगितलेली व मला करता येणारी तुझी कामं मी करतो. तू गाणं शीक.'परब, बेबी गाते, पेटी वाजवते, संगीताचे वर्ग चालवते.'

परब म्हणाले, 'मोकाशी, मान खाली काय घालता? मान वर करा. तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्हाला वाद्य वाजवणं जमलं नाही म्हणून तुम्ही संगीताचा, वाद्यांचा द्वेष करत बसला नाहीत; उलट तुम्ही मुलीला गाणं शिकण्याकरता उत्तेजन दिलंत.' मोकाशी उत्तेजित होऊन म्हणाले, 'ढोल गळ्यात लटकवून मी हिंडत असे त्या लहान वयात मी, 'गंगा यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा' या गाण्याचे सूर अनेक वेळा ऐकले. माझी बेबी हे गाणं गायला लागली, गाण्याच्या जाहीर कार्यक्रमामुळे बेबीला राजेशने, तिच्या आवाजावर लुब्ध होऊन मागणी घातली. गाण्याच्या जोरावर ती लग्नानंतर घरबसल्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली. मी भरून पावलो. ओक गळ्यात ढोलाचं ओझं घेऊन वरातीमुळं मी देवदेवतांच्या समोरील रस्त्यांवरून फिरलो. मला देव पावले. माझ्या गळ्यात ढोल बांधणाऱ्या व्यायामशाळेचा मी ऋणी आहे.'

मोकाशींनी रुमालानं डोळे पुसले. ओक चमकले. आपण मोकाशी या हळव्या बालमित्राला ओळखण्यात कमी पडलो. मोकाशींना वाद्ये वाजवता आली नसतील. त्यांच्या हृदयात संगीतभक्तीचे ठोके कृतज्ञ ताल धरून होते. ओकांनी मित्रभावनेनं विचारलं, 'तुम्ही 'सूरझंकार' या संस्थेचे सभासद आहात, होय ना?' 'मला संगीत वाजवता येत नाही, ऐकता येतं. व्यायामशाळेच्या बॅण्डमुळे मला संगीत समजलं. मी 'सूरझंकार'मध्ये गाणं ऐकायला तर जातोच. पण जाजमं पसरणं, खुर्च्या मांडणं, गायक-कलाकार यांची सोय-गैरसोय पाहणं ही कामंही करतो. ओक, सूर माझ्या मनाला शांतता देतात.'

ओकांनी बालपणापासूनच्या आपल्या मित्राला घट्ट मिठीत घेतलं व प्रेमचिंब स्वरात म्हणाले, 'मोकाशी, तुम्ही कर्मयोगी संगीतसेवक आहात. तीन व्यक्ती या जगात सोन्याची फुलं वेचतात असं संस्कृत सुभाषित आहे. एक उत्तम विद्याभ्यास केलेली, दुसरी शूर, पराक्रमी आणि तिसरी व्यक्ती म्हणजे मनापासून सेवा करणारी. मोकाशी, तुम्ही संगीतसेवक नाही, सेवकसम्राट आहात. सुभाषित आहे- 'सुवर्णपुष्पाम् पृथिवीम् चिन्वन्ति पुरुषा:त्रय: । शूर:च कृतविद्य:च य: जानाति सेवितुम् ।।' मोकाशींना मिठीत घेत परब म्हणाले, 'मोकाशी, तुमची ही सेवावृत्ती मला लाभावी. विठ्ठलाकारणी मी ती वापरीन.' मित्रद्वयीच्या प्रेमाने मोकाशी अवघडले, ते काही बोलूच शकत नव्हते, गाऊ तर शकतच नव्हते!

(क्रमश:)

- भा. ल. महाबळ फोन 
: ०२२-२१६३१९४०
Powered By Sangraha 9.0