स्वतःला असहाय समजू नका

09 Apr 2020 13:47:39
 
 
स्वतःला असहाय, हतबल समजलात तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करून आलाच म्हणून समजा. त्या राक्षसाला भिडायचं नाही, आणि शरणही जायचं नाही.
 
सध्या साऱ्या जगभर कोरोनाचे संकट घोंगवत आहे. अशा संकटाला सामोरे जाताना मानसिक स्थिती फार गंभीर ठेवावी लागते. अर्थात कोरोनाचे हे संकट काही महिन्यांनी दूर होईल. पण प्रत्येक माणसाला रोजच कशाची ना कशाची भीती वाटते. कधी काम नीट होईल की नाही ही भीती, कधी केलेल्या कामाचं चीज होईल की नाही ही भीती, कधी माझं भविष्य कसं असेल ही भीती.
 
कुणाला शिक्षणाची भीती, कुणाला लग्न न जमण्याची भीती, लग्न झालेल्यांना आयुष्य सुरळीत पार पडेल का असली भीती, कुणाला मुलं होण्याची भीती, कुणाला झालेली मुलं कशी निघतील याची भीती, कधी नवीन घर, बंगला मिळेल का नाही याची भीती तर, कुणाला माझ्या प्रिय व्यक्तीला काही बरवाईट झालं तर, असली विचीत्र भीती. भीतीवर अमेरिकेत एका संशोधकाने प्रयोग केला होता. दोन उंदरांना त्याने पकडुन आणलं आणि वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवलं.
 
पहिल्याला तो रोज कमी तीव्रतेचा इलेक्ट्रीकल शॉक द्यायचा, थोड्याच दिवसात ह्या टॉर्चरने पहिला उंदीर मेला. त्याचं डिसेक्शन करण्यात आलं, तेव्हा त्याच्या शरीरात एक विष तयार झालेलं आढळलं. दुसऱ्या उंदीराला बारीक जाळीच्या पिंजऱ्यांत ठेवून, त्याला एका मांजरापाशी ठेवलं. मांजर त्याचा फडशा पाडण्यासाठी सारखं त्याला रोखून बघायचं, पण जाळीमुळे तो खाऊ शकायचा नाही, दोघांनाही हे माहीत होतं, पण मांजराला नुसतं बघूनच उंदीर गलितगात्र व्हायचा, लवकरच भीतीने झुरुन तोही मेला, त्याचही डिसेक्शन झालं.
 
 आश्चर्य म्हणजे त्याच्याही शरीरात विषाचे अंश होते, इलेक्ट्रीक शॉकने मेलेल्या पहिल्या उंदरापेक्षा जास्त विष त्याच्या शरीरात आपोआप तयार झालं होतं. यावरून आपणही बोध घ्यायला हवा. चिंता करुन, काळजी करुन, भीतीने आतल्या आत झुरुन काय साध्य होतं. कितीही मोठं संकट असू द्या, त्याचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी मन सज्ज ठेवा. कोणत्याही प्रश्नापेक्षा मी मोठ्ठा या अ‍ॅटिट्यूडने जगा. पहा भीती पळून जाईल. स्वतःला लहान, असहाय, हतबल समजलात तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करून आलाच समजा, त्या राक्षसाला भिडायचं नाही, आणि त्याला शरणही जायचं नाही, त्याला निर्भयतेच्या बाटलीत बंद करुन ठेवायचं.
 
Powered By Sangraha 9.0