एडीएचडी डिसऑर्डर

    08-Apr-2020
Total Views |


d_1  H x W: 0 x

एखादं मूल खूप निष्काळजी असेल किंवा गरजेपेक्षा जास्त सक्रीय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा मुलांवर नजर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे एडीएचडी या आजाराचं लक्षण असू शकतं.

अभ्यासात आवड नसणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मित्र किंवा बहिण-भाऊ यांच्याशी भांडण, खूप सक्रीय दिसणं यांसारख्या सवयींचा मुलांच्या लहानपणाशी संबंध दिसतो. पण ही तिन्ही एडीएचडी डिसऑडरची सगळ्यात सामान्य लक्षणं आहेत.
पण अशी लक्षणं दिसत असणारं प्रत्येक मूल एडीएचडीने पीडित असेल असं नाही.

जी मुलं एडीएचडीने त्रस्त असतात, त्यांच्यामध्ये ही लक्षणं अधिक गंभीरतेने दिसतात आणि सतत दिसतात. या समस्येचं निदान करण्यासाठी ही लक्षणं मुलांमध्ये सहा महिन्यांहून अधिक काळ दिसणं गरजेचं असते. ही समस्या वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी सुरू होते. तसं बघायला गेलं तर बारा वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये याची लक्षणं कधीही दिसतात.

काय आहे एडीएचडी?

एडीएचडी म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑडर मुलांमध्ये आढळणारी मेंदुशी संबंधित एक सामान्य डिसऑडर आहे. ही किशोरावस्था किंवा प्रौढावस्थेपर्यंत राहू शकते. याची तीन कारणं असतात.

पहिलं अतिसक्रियता,आवेगशीलतेची लक्षणं दिसतात.

दुसऱ्यामध्ये सावधगिरीचा अभाव किंवा निष्काळजीपणा.

तिसऱ्यामध्ये ही सगळं लक्षणं दिसतात.

एडीएचडीने त्रस्त अधिकांश मुलांमध्ये ही सगळी लक्षणं दिसतात. एडीएचडीचं कारण एडीएचडी डिसऑडर काय आहे, याची निश्चित कारणं समजणं अवघड असतं. पण खालील काही कारणं असू शकतात

अनुवंशिकता : अनेक मुलांमध्ये एडीएचडी अनुवंशिकतेने आलेला असतो

पर्यावरणीय कारकं : ज्या महिला गर्भावस्थेत सिगरेट, दारू यांचं सेवन करतात, त्यांच्या मुलांमध्ये ही समस्या बघायला मिळते.

रासायनिक असंतुलन : ज्या व्यक्तींमध्ये एडीएचडी असते, त्यांच्या मेंदुतील रसायनांमध्ये असंतुलन आढळते.

मेंदुमध्ये परिवर्तन : मेंदुचा जो भाग ध्यानाला नियंत्रित करतो, तो मुलांमध्ये कमी सक्रीय असतो, ज्यांना एडीएचडी असते.

मेंदुला दुखापत : मेंदूच्या दुखापतीमुळे मेंदुचा पुढील भाग म्हणजेच फ्रंटल लोबचं नुकसान होतं. यामुळे भावनांवर नियंत्रण मिळविण्यास समस्या निर्माण होते.

प्रौढांनाही होते समस्या : एडीएचडी डिसऑडरने ग्रस्त मुलांमध्ये प्रौढ झाल्यानंतरही ही समस्या बघायला मिळते. याविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. अशा लोकांसाठी घरातून बाहेर पडणं, एखादी तारीख लक्षात ठेवणं, सकाळी उठणं, कामं करणं हे आव्हानात्मक असतं. लक्षणं आणि संकेत तीन सगळ्यात महत्त्वाची लक्षणं म्हणजे निष्काळजीपणा, अतिसक्रियता आणि आवेगशीलता. सगळ्या मुलांमध्ये ही सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही.

निष्काळजीपणाची लक्षणं असणारी मुलं

सहज चित्त विचलित होणे, एक काम सुरू करता करता दुसरं सुरू करणे गोष्टी विसरून जाणे आवडीचं काम करत असतानाही लगेच कंटाळा येणे आपल्या वस्तू हरवणे.

अतिसक्रियता असणाऱ्या मुलांमधील लक्षणं
कोणतीही गोष्ट करताना आपल्या जागेवर सतत हलणे,
न थांबता सतत बोलत रहाणे,
सतत इकडे-तिकडे फिरणे

आवेगशीलततेची लक्षणं
खूप अधीर असणे
आपल्या भावना उघडपणे अभिव्यक्त न करणे
विचार न करता कोणतंही काम करणे
खेळामध्ये स्वतःला खेळायला मिळेपर्यंत वाट पाहू न शकणे