उखळ आणि मुसळ

07 Apr 2020 14:13:53
 
 
 
 
जात्याप्रमाणेच पूर्वी घरात उखळ असायचे. उखळ आणि काही प्रमाणात खलबत्त्याची जागा आता मिक्सरने घेतली आहे. पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. एकदम वर्षभराचे धान्य घेतले जाई. त्याची वास्तपुस्त करणे, ते वाळवणे, निवडणे, भरून ठेवणे इत्यादी गोष्टी चार चौघीजणी एकत्र बसून हसत-खेळत, गप्पा गोष्टी करत असत. तसेच, दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी केली जात असे.
 
उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गव्हाच्या खिरीचे गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दाण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्त प्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण बऱ्यापैकी मोठे असे. घरात धान्य दळणे, मिरची कांडणे व मसाला वाटणे अशी सर्व कामे उखळ, पाटा-वरवंटा व जातं या द्वारे घरीच केली जात असत. परंतु, आता स्वयंपाक घरात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी, साधनांनी या गृहोपयोगी दगडी वस्तूंना हद्दपारच केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीत घरात जातं आणि उखळ या वस्तूंना लक्ष्मी मानले जाते. लग्न समारंभात त्यांना विशेष मान आहे. नवीन घर बांधताना कोपऱ्यात उखळ किंवा जाते बसविले जाते. त्यासाठी कधी तरी या साहित्याची मागणी केली जाते.
 
Powered By Sangraha 9.0