कवड्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

07 Apr 2020 14:13:46
 
कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात. कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.
  
 
कवडी हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात.
 
कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग करीत; त्याचप्रमाणे त्या दागिने म्हणून वापरत. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर दान टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गायी, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवड्यांचा वापर करण्यात येतो.
 
कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात. तशी प्रथा पूर्वापार चालत आली आहे.त्याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करत होते. असे अनेक पुरावे सापडतात. म्हणूनच तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्या माळांची दुकाने थाटली जातात.आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात. कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.
 
प्रत्येक प्रांतांत कवडीचे पूजन सुफलकारक मानले जाते. आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते. पंजाबात मुलगी सासरी जाताना तिला चरखा भेट देतात, त्याला कवड्या चिकटविलेल्या असतात. ओरिसातही रूखवत दिले जाते. त्याला जगथी पेडी असे म्हणतात. त्यातही कवड्या दिल्या जातात. विवाह समारंभात महाराष्ट्रात सुपारी सोडविण्याचा खेळ पूर्वी नवरा-बायकोमध्ये होत असे. ओरिसात सुपारीऐवजी कवडी वापरली जाते. राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात. आसाममध्ये वडीलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवड्यांचा खुळखुळ आवाज करतात. देशभरातल्या या पद्धतींना नवनिर्माणाची पूजाच म्हटली जाते. कवड्याची माळ गळ्यात मिरविणे म्हणजे, स्त्रीच्या नवनिर्मितीच्या शक्तीला वंदन करणे होय. त्यामुळेच कवड्यांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते. श्रीमहालक्ष्मीचा उपासक पोतराजही कवडी अंगावर मिरवितो. 
 
Powered By Sangraha 9.0