येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात नवा असतो. कालचा दिवस हा भूतकाळ झाला. समोर उभा असतो वर्तमान काळ. रात्र संपून सूर्याची कोवळी किरणे नवा दिवस सुरू झाल्याचे सांगत असतात. वेळ शांत असते. दिवसभर कामाचा धडाका असणारच; पण या वेळेचा आनंद घ्यायला शिकायला हवे. साध्या सवयींमधून आपण ते करू शकतो. ते जमायला लागले की पाहा, तुमचा रोजचा दिवस कसा मस्त जातो ते.
शांतता अनुभवा पहाटेची वेळ म्हणजे शांततेची वेळ. तुम्ही पहाटे उठणारे असाल, तर फारच छान. पहाटे उठणारे नसाल, तर ती सवय करा. त्यावेळेत काही काम करू नका किंवा कामाचा विचारही मनात आणू नका. मस्तपैकी चहा किंवा कॉफी बनवा आणि आपल्या जवळच्यांबरोबर गप्पा मारा. ते करायचे नसेल, तर चहा-कॉफीचा कप घेऊन खिडकीजवळ या किंवा बाल्कनीत बसा. निवांतपणाने पेपर चाळा, वाचा. पेपर नको असेल, तर आवडीच्या एखाद्या पुस्तकातील एक पान वाचा. पहाटेच्या वेळी पक्षी उत्साहाने कूजन करत असतात. ते ऐका, त्यांची धावपळ पाहा. हे सगळे सुरू असताना वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यासारखे दुसरे समाधान नाही. हा उपाय करून पाहा, दिवसभर फ्रेश राहाल.
कामांचे नियोजन करा आला दिवस ढकलण्याच्या नादात दिवस कधी सुरू होतो आणि संपतो याचा पत्ताच लागत नाही. मग त्यात काही कामे होतात आणि काही वेळीच न आठवल्यामुळे मागे पडतात. तसे न करता दिवसभरात करावयाच्या कामांचा आढावा पहाटेच्या वेळी घेऊन ती कोणत्या क्रमाने करावयाची याचे नियोजन करा. लक्षात ठेवणे अवघड जात असेल, तर कामांची लेखी यादी तयार करा. त्यानुसार वागलात, तर तुमची सगळी कामे वेळेवर पार पडतील.
शुभेच्छा सकाळीच द्या नातलग, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस म्हणजे आपल्यालाही आनंदच. संबंधितांना भेटणे शक्य नसेल, तर त्यांना आवर्जून शुभेच्छा द्या. पण त्या वेळीच देणे विसरू नका. थोड्या वेळाने देऊ शुभेच्छा म्हणत आपण कामात बुडतो आणि रात्र होऊन जाते. आपण तोपर्यंत विसरलेले असतो. काही वेळा तर थेट दुसऱ्या दिवशीच शुभेच्छा देण्याची आठवण होते! कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळीच द्या. सकाळीच कोणी शुभचिंतन केले, तर संबंधितांना समाधान मिळते आणि तुम्हालाही बरे वाटते. त्यातून त्यांचा आणि तुमचाही दिवस मस्त जातो. संगीतमय प्रारंभ करा दिवसाच्या सुरूवातीला मंद, मनाला प्रफुल्लित करणारे संगीत ऐकलेत, तर दिवस छान जातो. शांतपणाने बसून संगीत ऐकलेत तर फारच चांगले; पण ते शक्य नसेल, तर कामे करतानाही तुम्ही संगीत ऐकू शकता. कर्कश गाणी ऐकण्यापेक्षा मन प्रसन्न करणारे संगीत ऐका.
संगीतमय प्रारंभामुळे दिवस छान जाईल. नाष्टा वेगवेगळा बनवा कामाचा दिवस सुरू करण्यापूर्वी पोटाची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नाष्टा महत्त्वाचा असतो. रोज तेच पदार्थ खाण्याऐवजी दोन-तीन दिवसांनी नवा पदार्थ बनवा. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कितीतरी नवे पदार्थ करायला शिकू शकता. भरपेट चवदार नाष्टा तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतो हे लक्षात ठेवा. थोडा व्यायाम करा चपळ आणि तंदुरुस्त शरीरासाठी हालचाल हवीच. त्यासाठी अगदी जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची गरज नाही. घरीच योगासने, प्राणायाम आणि अन्य व्यायाम करून तुम्ही स्वत:ला ताजेतवाने करू शकता. चालण्याची आवड असेल, तर पहाटेच्या वेळी चालण्यासारखे सुख नाही. थोड्या व्यायामामुळे तुमचा दिवस चांगला जातो.