ऑरगॅनिक शेतीत कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी शेणखत, गांडूळखत वापरतात. सलग तीन वर्षे मातीचा कस वाढवून ऑरगॅनिक उत्पादन घेतले जाते.
गेली काही वर्षे ऑरगॅनिक खाद्यपदार्थांची सर्वत्र धूम आहे. ऑरगॅनिक पदार्थ ऑरगॅनिक शेतीतून येणाऱ्या उत्पादनातून होतात. पर्यावरणस्नेही तंत्राचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीत कसल्याही प्रकारची रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, सांडपाणी, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले बियाणे वापरले जात नाही. मातीचा कस वाढवणे आणि टिकवणे महत्त्वाचे मानले जाते. बदलती पिके घेऊन मातीचा कस कायम राखतात. कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी शेणखत, गांडूळखत, जैविक कचरा आणि हिरव्या पानांचे खत वापरतात. असे सलग तीन वर्षे मातीचा कस वाढवून ऑरगॅनिक शेती उत्पादन केले जाते.
शेतीसाठी कोणतेही रासायनिक कीटकनाशक वापरत नाहीत. ऑरगॅनिक पदार्थ करताना कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाहीत किंवा ते रिफाइंड करत नाहीत. व्यावसायिक पशुपालनामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके किंवा हॉर्मोन्स न देता दूध, अंडी, मांस, मासे अशी ऑरगॅनिक खाद्ये केली जातात. ऑरगॅनिक आजमितीला सौंदर्यप्रसाधने, घराच्या स्वच्छतेचे पदार्थ, कपडे, होळीचे रंग, गुलाल अशा अनेकविध तऱ्हांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मानवी आरोग्य व पर्यावरण या दोहोंचेही रक्षण होण्यास मदत होते.
ऑरगॅनिक अन्नपदार्थाची मागणी दरवर्षी सुमारे २३ टक्क्यांनी वाढत आहे. भारतात सुमारे ५७.८ दशलक्ष हेक्टर जमीन प्रमाणित ऑरगॅनिक शेतीखाली आहे, त्यांपैकी २४ दशलक्ष हेक्टर पूर्णतः प्रमाणित आहे. जगातल्या ऑरगॅनिक शेतकऱ्यांपैकी ३० टक्के भारतीय आहेत. पण जागतिक पातळीवरील उत्पादनात आपला सहयोग फक्त १.३ टक्केच आहे. २०१७-१८ मध्ये देशामध्ये १७ लाख मेट्रिक टन ऑरगॅनिक शेतमालाचे उत्पादन आणि ४.८ लाख मेट्रिक टन निर्यात झाली.
केंद्र सरकारने दिलेल्या सवलतींमुळे अधिकाधिक जमीन ऑरगॅनिक शेतीच्या लागवडीखाली येत आहे. अनेक नवनवे ऑरगॅनिक पदार्थ बाजारात येत आहेत. हे पदार्थ आरोग्यदायक असल्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले असंख्य लोक यांचा वापर करू लागले आहेत. ऑरगॅनिक खाद्यांमध्ये आरोग्यवर्धक अशी नैसर्गिक रसायने अ-जैविक पदार्थांपेक्षा अधिक प्रमाणात असतात. उदा. पॉलिफीनॉल १७ टक्क्यांनी, फ्लावानॉल्स, अँथोसायनिन्स आणि फीनॉलिक अॅसिड तब्बल ६९ ट्न्नयांनी जास्त असतात. त्याचबरोबर रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरल्याने विषारी द्रव्यांचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे हे पदार्थ आरोग्यदायी असतात.