त्सुनामी लाट कशी र्निर्माण होते?

03 Apr 2020 16:17:46
 
 

 
 
 
त्सुनामी म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते, त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यामुळे त्सुनामी निर्माण होऊ शकतात.


त्सुनामी हा जपानी शब्द असून, त्याचा अर्थ बंदरातील लाटा असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलित होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले. किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते; पण तरंग लांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु, जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंग लांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील श्नती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते.


खोल समुद्रामध्ये त्सुनामीची तरंग लांबी २०० कि.मी. व तरंग उंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते. सागराच्या तळाशी होणाऱ्या प्रचंड शक्तीच्या भूकंपाला, त्यापासून निर्माण होणाऱ्या त्सुनामींना कोणतीही शक्ती थोपवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही; पण अत्याधुनिक विज्ञान -तंत्रज्ञानामार्फत त्सुनामीची निर्मिती झाल्यानंतर त्यापासून कोसळणाऱ्या आपत्तींची आणि ग्रस्त होणाऱ्या प्रदेशांची इत्थंभूत माहिती तत्काळ उपलब्ध होते.



धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा क्षणार्धात कार्यरत होऊन तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून दुजोरा मिळवून ग्रस्त प्रदेशांतली प्राणहानी, वित्तहानी जास्तीत जास्त प्रमाणात नियंत्रित केली जाते. अशा स्वरूपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा महासागरांमध्ये ठिकठिकाणी कार्यरत आहे. २६ डिसेंबर २००४ ला सुमात्राच्या बांदा ऐच किनाऱ्याजवळ पहाटेच्या सुमारास ९.१ रिश्टर शक्तीचा भूकंप झाला. त्सुनामीच्या विध्वंसक लाटांनी बंगालच्या उपसागरात थैमान घातलं. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, भारताचा पूर्व किनारा, श्रीलंका, मालदीव आणि सोमालिया या राष्ट्रांमध्ये सुमारे अडीच लाख व्यक्तींना प्राण गमावावे लागले.



११ मार्च २०११ रोजीही दुपारी तीनच्या सुमारास जपानच्या ईशान्य किनाऱ्यापासून साधारणतः २०० किलोमीटरवर ८.९ रिश्टर शक्तीचा भूकंप जाणवला. महाकाय त्सुनामीच्या लाटा उत्तर पॅसिफिक महासागरात निर्माण झाल्या. फुकुशिमा प्रांताच्या किनारपट्टीवर अर्ध्या तासात आदळल्या आणि सुमारे वीस हजार व्यक्तींना जलसमाधी मिळाली
 
 
 
Powered By Sangraha 9.0