चणे फुटाणेही आरोग्यासाठी उत्तम

29 Apr 2020 12:00:24



चणे - फुटाण्यात कार्बोहायड्रेड, प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे रोज ५० ते ६० ग्रॅम फुटाणे खाणे आरोग्यासाठी चांगले असते, असे संशोधकांनी अभ्यासाअंती सांगितले आहे.


रस्त्यावर चना गरमवाल्या व्यक्तीकडून आपण अनेकदा टाईमपास म्हणून पाच दहा रुपयांचे चणे फुटाणे विकत घेतो आणि खातो. त्यामुळे तोंडाची चव बदलते, फ्रेश वाटते, थोडी पोटपूजा होते आणि खरेच हाता-तोंडोला थोडे वेगळे काम मिळाल्याने टाईमपासदेखील होतोच. त्यामुळे अशा प्रकारे टाइमपास म्हणून चणे-फुटाणे खाण्यास अनेकांना आवडते. पण यातून तुमच्या शरीरालादेखील फार मोठा लाभ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठीच की काय फुटाण्यांना गरिबांचे बदाम म्हटले जाते.

हे बदाम रोज खाल्ल्याने शरीर स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरते. यातून कार्बो हायड्रेड, प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. एका व्यक्तीने रोज ५० ते ६० ग्रॅम फुटाणे खाणे आरोग्यासाठी चांगले असते, असे दिल्लीतील इंडियन स्पायनल इंज्युर सेंटरच्या वरिष्ठ संशोधकांनी अभ्यासाअंती सांगितले आहे. रोज नाष्टा अथवा दुपारच्या जेवणापूर्वी फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येते. 

हवामान बदलल्यावर नेहमी होणाऱ्या शारीरिक त्रासांपासून बचाव होतो. तसेच लठ्ठपणा, लघवीसंबंधीत विकार, कमकुवत पचनशक्तीवर मात करण्यासाठी फुटाणे खाण्याचा उपाय हितकारक आहे. फुटाण्यांमध्ये फॉस्फरस असतो. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार रोज चणे-फुटाणे खायला काहीच हरकत नाही. टाईपासबरोबरच यातून शारीरिक फायदा होणार असेल तर यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे अधूनमधून नव्हे तर रोजच चणे फुटाणे खायाला हरकत नाही. त्यातून शरीराला फायदाच होणार आहे.
Powered By Sangraha 9.0