मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ज्येष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आहे. नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासनही मदत करत आहे. तसेच फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही राज्यभरातील ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मनःस्वास्थ्य हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तके वाचावीत. मन रमविण्याचा प्रयत्न करावा. असेही आम्ही सुचवितो.अशी माहिती फेडरेशन ऑफ सीनिअर सिटिझन्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली. पुणे शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास पाच हजार आहे. या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश नागरिक बेडरेस्ट आहेत. तर काही नागरिकांना लॉकडाऊनमुळे दैनंदिन व्यवहार करणेही मुश्किल होऊन बसले आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न भेडसावत आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचे नातेवाईक, शेजारचे नागरिक, सामाजिक संघटनांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे. बहुतांश नागरिकांचे दोन वेळेचे जेवण खानावळीच्या डब्यावर अवलंबून आहे. खानावणीचा माणूस डबा घेऊन आला तरच जेवायला मिळते. नाही आला तर ज्येष्ठ नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत त्यांचे नातेवाईक, शेजारचे नागरिक,सामाजिक संघटनांनी मदत करणे गरजेचे आहे. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी १०९० ही हेल्पलाईन सुरू केली आहे. परंतू पोलिस प्रशासन देखील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येपुढे अपुरे ठरत आहे. कारण, स्वयंपाकाचा गॅस आणण्यापासून ते भाजीपाला, दूध तसेच दररोजची औषधे यासारख्या अनेक गरजा असल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. भाजीपाला आणणे, किराणा आणणे, बँकांतून पेन्शन आणि बचत खात्यातून रक्कम आणणे. मेडिकल शॉपीच्या मालकाला औषधांची ऑडर देणे. यासारख्या दैनंदिन गरजांसोबतच त्या ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहायला पाहिजे.
त्यांचे मानसिक संतुलन बिघडता कामा नये. यासारख्या अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या वृद्धांश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिक राहतात. त्या वृद्धाश्रमांकडेही दैनंदिन गरजांचा पुरेसा पुरवठा असेलच असेही नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक परावलंबी आहेत. काही नागरिक रुग्णालयांत उपचार घेत आहेत. परंतू त्यांच्याकडे पाहायला, देखभाल करायलासुद्धा त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी नाही. अशा अनेक समस्यांना सध्या ज्येष्ठ नागरिकांना नोंद द्यावे लागत आहे.
निवृत्त शिक्षिका रोहिणी कांदळे म्हणाल्या, मी आता पंचाऐंशी वर्षांची आहे. मला पेन्शन आहे. परंतू पेन्शन काढायची म्हटली, तरीही बँका बंद आहेत. अशा परिस्थितीत इतरांवर अवलंबून राहावे लागते. निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी उल्हास पिंगळे म्हणाले की, पुणे शहरात असंख्य ज्येष्ठ नागरिक राहतात. अनेकांची वये ८० ते ८५ च्या पुढे आहेत. या वयात फारसे चालणे होत नाही. असे नागरिक घरातच बसून असतात. त्यांच्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. परंतू सामाजिक संघटना, शेजारचे नागरिक आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईकांनी सुद्धा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.