मनाची स्वच्छता हवी...

27 Apr 2020 12:22:19



लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घराचे कोपरे झाडून-पुसून स्वच्छ केले असतील. तसेच पुढच्या काही दिवसात मनाचेही करायला हवेत. कारण, या मनाच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सुख-दुःख, राग, लोभ, चिंता अशा खूप आठवणी साठून राहिलेल्या असतात. त्या सगळ्याच उपयुक्त असतात, असं नाही. 

म्हणूनच, नको असलेल्या गोष्टींची जळमटं आता या काळात झाडून टाकलेलीच बरी. काही विषय नंतर बघू.. असं म्हणून मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात ढकलले असतील तर तेही काढून आता स्वःच्छ करायला हवेत. एकंदरच सगळ्याची स्वच्छता करुन घ्यायला हवी. विशेषतः कानाची आणि मनांचीही. अनेक गोष्टी फक्त कानावर पडल्यानंही आपल्याला दुःखं होतं. ते विषय पुन्हा पुढच्या वेळी त्रासदायक ठरु नयेत, यासाठी ही स्वच्छता हवी. 

हेच सगळं डोळ्यांच्याही बाबतीत असतंच. डोळ्यांच्या मार्गे मनात गेलेल्या गोष्टींसाठी अशी स्वच्छता हवी. जरी ही स्वच्छता करता आली तर पुढच्या काळात आशा-अपेक्षा, विश्वास यांच्या पायघड्या त्या कोपऱ्यांमध्ये घालता येतील. मनभर प्रसन्नतेचं रंगकाम करता येईल. ही जळमटं दूर झाली की मग, नवे विचार, नवीन चिंतन, त्या मनाच्या कोपऱ्यात सुरु होऊ शकेल. स्वच्छ झालेलं मन शांत होऊ शकेल. हे सगळं चांगलं जमून आलं तर आनंदी आयुष्यही वाढेलच ना..!
Powered By Sangraha 9.0