लग्नासाठी इच्छुक तरुणांनी बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे...

26 Apr 2020 12:39:18



महिला सबलीकरण आणि समानतेसारख्या विषयावर आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे. असे असले तरी समाजाची आणि त्यातही पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी वेळ लागणार आहे. आता मुली शिकत आहेत, शिकून विचार करू लागल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. विविध विषयांवर त्यांची काही मते असतात.


विवाहाचा खर्च निम्मा करा 
सर्वसाधारणपणे लग्नाचा सगळा खर्च मुलीच्या कुटुंबावर टाकला जातो. त्यामुळे लग्नाच्या सोहळ्याच्या आनंदात त्यांच्यावर किती ताण आलेला असतो याची कल्पना करता येत नाही. त्यात पुन्हा त्यांना भपकेबाज आणि खर्चिक लग्न करताना किती त्रास होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. हे सगळे लक्षात घेऊन तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना तुमचा रुबाब दाखवण्यासाठी मुलीच्या वडिलांना खर्च करायला भाग पाडू नका. तुम्ही त्यांच्या मुलीशी लग्न करता म्हणजे त्यांच्या खर्चाने तुमचा बडेजाव दाखवावा असे नव्हे. शक्यतो लग्नासाठी आपल्याला परवडेल असा खर्च करावा. दोन्ही बाजूंनी निम्मा-निम्मा खर्च उचलावा.

स्त्रियांमध्ये वेगाने होत असलेला या बदलाकडे सकारात्मकतेने पाहण्याची भारतीय पुरुषांची तयारी नसल्याने नात्यांमध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात. त्यासाठी पुरूषांनी काही प्राथमिक बाबतीत तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. विशेषतः लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना याचा निश्चितपणे विचार करावा लागेल. लग्न म्हणजे नेमके काय आणि लग्नामुळे दोन जीव, दोन कुटुंबे एकत्र येत असल्याने कराव्या लागणाऱ्या तडजोडी, एकमेकांना आणि नातेवाईकांना समजावून घेण्याची तयारी, संसाराची जबाबदारी या सगळ्या गोष्टी नीट समजावून घेणे महत्त्वाचे असते. कारण दुसऱ्या घरातील मुलगी सगळे सोडून तुमच्यासाठी येणार असते. तेव्हा तिच्या भावभावना, स्व-प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात. प्रत्येक क्षणी तिच्या पाठीशी उभे रहावे लागते. निर्णय प्रक्रियेत तिचे मत विचारात घ्यावे लागते. याच्याआधी काही प्राथमिक बाबींमध्ये पुरुषांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे.


खोटी प्रतिष्ठा मिरवू नका : आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी उगाचच भपकेबाज लग्न करू नका. लग्नासाठी कधीही कर्ज काढू नका. समाज काय म्हणेल आणि लोक काय म्हणतील याची काळजी करू नका. तुम्ही कसेही लग्न केले तरी ज्यांना नावे ठेवायची असतात ते नावे ठेवतातच. खर्च केला म्हणून किती ही उधळपट्टी अशी शेरेबाजी करणारे कमी नसतात. त्यामुळे उगाच खर्च करून भविष्यात काटकसरीने जगण्याची वेळ स्वतःवर येऊ देऊ नका.


नाव बदलण्याचा आग्रह नको : पत्नीला नाव बदलण्याची सूचना करणे किंवा तसा आग्रह धरणे चुकीचे आहे. पूर्वीचे नाव कायम ठेवून ती तुमच्या कुटुंबातील सदस्य होऊ शकते. त्याहीपेक्षा तिच्या नावाशी तिच्या अनेक भावनिक आठवणी निगडीत असतात. तिचे नाव हे तिची ओळख असते. आता तिचे लग्न झाले आहे म्हणून तिने तिची ओळख पुसून टाकावी अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही.


हुंड्याला नाही म्हणा : अगदी मुलींच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असली आणि मुलीला भेट म्हणून ते दागिने किंवा महागड्या वस्तू देऊ इच्छित असतील तरी तुम्ही त्याला ठामपणे नाही म्हणा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हुंडा घेण्यास आणि देण्यास ठाम विरोध करा. लक्षात ठेवा तुम्ही अप्रत्यक्षपणे सुचवून किंवा आडवळणाने सांगून काही वस्तू किंवा पैसे मुलीच्या वडिलांकडून घेतले तर ते तिच्या मनात आयुष्यभर राहते. तिच्या अपरोक्ष असे घडले असल्यास तिला जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा पतीबद्ल आणि सासरच्यांबद्दल तिच्या मनात अढी निर्माण होते. पर्याय नसल्याने ती बोलत नाही पण आपल्या वडिलांकडून घेतलेल्या वस्तू किंवा पैशांबद्दल तिच्या मनात रुखरुख राहतेच. त्यामुळे कुठल्याही प्रकारातील हुंड्याच्या विरोधात भूमिका घ्या.


पुरूषी अहंकार सोडा : लग्नाच्या आधी अनेकदा घरातील कामे करण्याची सवय नसते किंवा स्त्रीने करण्याची कामे आणि पुरूषांनी करण्याची कामे अशी वाटून दिलेली असतात. पण प्रत्यक्षात तसे काही नसते. कारण घरातील कुठल्याच कामाला हात लावायचा नाही अशी पुरूषांची मानसिकता असते. पण आता बदलत्या काळात पत्नीला मदत घरातील सर्व कामांमध्ये मदत करण्याची पतीची भूमिका असली पाहिजे. भांडी धुणे, कचरा काढणे, भाजीदूध आणणे, दळण आणणे इत्यादी कामे करण्यात कुठलाही कमीपणा वाटून घेऊ नये.
Powered By Sangraha 9.0