
बोलण्यात वाया जाणारी शक्ती वाचवून शांत बसणे योग्य
मौनातून साध्य होतात अनेक कामे आणि सुटतात समस्या थोडक्यात
बोलण्यामुळे कामे होतात झटपट
अन्यायाविरुद्ध आवाज
उठविणे योग्यच; पण ते नेहमी नाही.
काही वेळा शांत राहणे जास्त चांगले असते.
एखाद्या नाजूक क्षणी नको ते बोलून गेल्यामुळे स्थिती आणखी बिघडते. शांत राहणे ही
सुद्धा एक कला आहे आणि ती साध्य केली, तर
आपले मन शांत राहून मनस्ताप
टळतो. तुमच्या शांत राहण्यामुळे तुमच्यावर अन्याय केलेल्यावरही परिणाम होतो. शांत
राहण्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी का होईना,
शांत राहायला शिकायले हवे...
भारतीय संस्कृतीने जीवनाच्या विविध अंगांचा सखोल विचार केला
आहे. त्यात वर्तणूकही येते. राग येणे, अन्यायाविरुद्ध
आवाज उठवावासा वाटणे साहजिक आहे. पण, त्यात तारतम्य बाळगायला हवे. मौनम् सर्वार्थ साधनम हे वचन
तेच सांगते. माणसाला सर्व गोष्टी काबूत आणता येतात; फक्त जीभ
नाही, असेही म्हणतात आणि ते सत्य आहे. बोलण्याने अनेक कामे होत असली, तरी नको तेथे
नको ते बोलल्याने होणारी कामे बिघडून आयुष्यभराचा
कडवटपणा उरतो. हे टाळण्यासाठीच कमीत कमी बोलावे असे म्हटले
जाते. वेळप्रसंग पाहून आवाज उठविणे योग्य, पण एरव्ही
मौन किंवा शांत राहणे हेच सर्वांत उपयुक्त हे लक्षात ठेवायला
हवे. शांत राहण्याचा मुख्य फायदा म्हणजे तुमच्या
शारीरिक ऊर्जेची बचत. मन एकाग्र करण्यासाठीही शांत राहणे
चांगले. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करायला लागतो आणि त्यातून समस्या सोडविण्याचे मार्ग सापडतात.
समस्या सुटल्यावर मिळते निखळ समाधान आणि
निरामय जीवन. यापेक्षा आणखी काय हवे? बोलण्यात
वाया जाणारी शक्ती वाचवून शांत बसणे योग्य मौनातून साध्य होतात
अनेक कामे आणि सुटतात समस्या थोडक्यात बोलण्यामुळे
कामे होतात
झटपट बोलण्याचे व्यसन : सकाळी
झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपायला जाईपर्यंत काही ना काही बोलणे सुरू असलेल्या जगात आपण राहतो आहोत. बोलण्याचे
जणू व्यसनच लोकांना लागले आहे. सध्याच्या काळात या
कोलाहलाची आपल्याला एवढी सवय झाली आहे, की काही क्षणांच्या शांततेमुळेही आपण अस्वस्थ होतो! मग
काही न सूचल्याने सरळ फोन उचलून कोणाबरोबर तरी
बोलायला लागतो. काम असो वा नसो; आपल्याला बोलायचे असते एवढेच.
कामाचे बोलणे सुरू असतानाही अकारण, फालतू
मुद्द्यांवर जास्त वेळ घालविला जातो. त्यात कोणाची स्तुती तर
कोणावर टीकेचा मारा असतो. अशा वाचाळ
जगात राहत असताना आपण मौनाचे किंवा शांततेचे महत्त्वच विसरलो आहोत. मौनाचे
महत्त्व समजले आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, तर भाषेच्या कोलाहलातसुद्धा आपण शांतता अनुभवू शकतो.
मन:प्रसाद: सौम्ययत्व मौनमात्मविनिग्रह:। भाव
संशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते...।
जीवनाविषयी सांगोपांग मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेतील या श्लोकात मनाची स्वच्छता, सौम्यता किंवा सौमनस्याबरोबर मौन हा सर्वश्रेष्ठ गुण असल्याचे म्हटले आहे. मौन म्हणजे मुनी भाव असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आपण कोण आहोत याचा एकाग्रपणे विचार करण्याला निदिध्यासन असे दुसरे नावही आहे. न बोलणे किंवा कमी बोलण्याने संयम राहतो. मौनाला मानसिक तपही म्हटले जाते. मानवी शरीरातील ऊर्जेच्या बचतीबरोबरही मौनाचा संबंध आहे. बोलण्याच्या क्रियेसाठी उदान वायूची मदत होत असल्याचे आयुर्वेद मानतो. हाच वायू बल आणि सामर्थ्यही देतो. पण, जास्त किंवा अति बोलण्यामुळे उदान वायू जास्त खर्च होऊन शरीर दुर्बळ होते. त्यामुळेच बहुधा, वाचाळापेक्षा शांत माणसाचे आयुष्य जास्त असल्याचे म्हटले जात असावे. मौनाचे महत्त्व आपल्या संस्कृतीतच आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनी आणि संत मौन साधना करित असत. आजच्या आधुनिक काळातही या साधनेचे महत्त्व टिकून आहे. स्वत:ला बदलण्यासाठी, आत्मपरिवर्तन करण्यासाठी मौन ही पहिली पायरी असते. मौन म्हणजे आत्म्याच्या खुराकाचा स्रोत असल्याचे महात्मा गांधीजी मानत असत. सत्याच्या प्रत्येक पुजाऱ्याने मौन बाळगणे गरजेचे असल्याचे मी अनुभवातून शिकलो आहे, असे त्यांनी सत्याचे प्रयोग या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात म्हटले आहे.
मौनामुळे काय साध्य होते? योग्यप्रकारे
पाळल्यास, आत्मबळ वाढून आत्मिक शांतता
लाभते. भीती आणि चिंता मौनामुळे दूर होऊ शकतात.
त्यामुळेच एक चूप, हजार सुख असे म्हटले जाते. अर्थात मौनाचा वापर तारतम्याने करायला हवा. आपल्यावर
होणाऱ्या अन्यायाच्या वेळी मौन बाळगणे चुकीचे आहे.
मात्र, संताप आलेला असताना गप्प राहणे
किंवा कोणावर टीका करण्यापेक्षा मौन बाळगणे केव्हाही
श्रेयस्कर ठरते.
जबाबदारीने बोला : शब्द आणि
भाषा ही आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. शब्दच नसलेले मौनी जग कसे दिसले असते याची कल्पनाही करता येत नाही.
कदाचित संभाषणाचा दुसरा काही मार्ग अस्तित्वात आला असता. पण, शब्दांविना
संभाषणात मजा आणि अर्थ आले नसते हे नक्की. आपल्या भावना व्यक्त करायला
शब्दांएवढे ताकदवान आणि प्रभावी माध्यम दुसरे नाही.
पण, या शब्दांपासून बनलेल्या भाषेचा
वापर किती जबाबदारीने करतो? बोलता येते
म्हणून किती आणि काय बोलावे याचा विचार आपण किती
करतो? थोडे आजूबाजूला पाहिलेत, तर बहुसंख्य
लोक जरुरीपेक्षा जास्तच बोलताना दिसतील. आपण काय बोलतोय याचा विचार
त्यात नसतो. ती व्यक्ती सगळ्या गोष्टी आपल्याला का
ऐकवित आहे, असा प्रश्नही पडतो. म्हणजेच बोलण्यावर संयम असणे आवश्यक आहे.
मनावर सकारात्मक परिणाम : आहार आणि निद्रेसारखेच मौनही आवश्यक असल्याचे किती जणांना
माहिती आहे? जीवनात शांततेचे
महत्त्व मोठे आहे. रोजच्या कोलाहलातून काही काळ स्वत:बरोबर घालवायला आपण
शिकले पाहिजे. शांत राहण्यामुळे राग, लोभ आणि अन्य विकारांपासून आपण काही काळ तरी दूर राहतो आणि मनाच्या
आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी
काही काळ मौन बाळगणे किंवा शांत राहणे गरजेचे आहे.
संस्कृतचे महान कवी राजा भर्तृहरी यांचा एक श्लोक मौनाचे
महत्त्व सांगतो.
स्वायत्तमेकांतगुणं विधात्रा विनिर्मितम् छादनमज्ञताया: विशेषत: सर्वविदा
समाजे विभूषणं मौनम पंडितानाम...
परमेश्वराने माणसाला मौन राखण्याचा गुणही दिला आहे. माणसाची इच्छा
असल्यास तो या गुणाचा फायदा घेऊ शकतो असा या श्लोकाचा अर्थ आहे.
ज्ञानी लोकांच्या बैठकीत तुम्ही बसला आहात आणि चर्चा
सुरू आहे. ती सुरू असताना मध्येच काही बोलण्यापेक्षा
तुम्ही ती चर्चा शांतपणाने ऐकलीत, तर अनेक नव्या गोष्टी समजतात आणि तुमच्या समजूतदारपणाची प्रशंसाही होते.
दुसऱ्याचे बोलणे एकाग्रपणे ऐकता येणे आणि ते पूर्णपणे समजणे हा
मौनातून होणारा एक मोठा फायदा आहे. याच मौनाचा वापर
कुटुंब आणि मित्रांबरोबर केलात, तर त्याचे सकारात्मक
परिणाम दिसतील. जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मौन देते. तुमची जीभ शांत राहिली (म्हणजे गप्प बसलात), तर त्याचा
परिणाम डोळे, चेहरा आणि मनावरही
होतो. त्यामुळे मौनात असताना फक्त श्वासाच्या गतीवर लक्ष केंद्रित
करा. मौनामुळे मनाची ताकद वाढते. भीती, राग, चिंता आणि व्यग्रतेतून मन मुक्त होते. मनोविकारांवर नियंत्रण
आणण्याची क्षमताही मौनात असल्याचे तुम्हाला त्याचा
अभ्यास सुरू केल्यावर लक्षात येईल. आपल्याला काय हवे आहे हे
तुम्ही बोलूनही काही वेळा समोरच्या व्यक्तीला कळत नसेल, तर लिहून दाखविणे हा एक पर्याय असतो. पण, तोही
निरुपयोगी ठरत असेल, तर मौन हाच उपाय उरतो आणि बहुतेकदा तो यशस्वी ठरतो.
तुम्ही गप्प बसल्यामुळे समोरच्या
व्यक्तीला तुम्हाला काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी वेळ मिळतो. एक उदाहरण पाहा. तुमच्या कार्यालयात तुम्हाला काही
बदल गरजेचा वाटतो आणि तसे तुम्ही वरिष्ठांना सांगता, लेखीही देता.
पण, तिकडे दुर्लक्ष केले जाते. तुम्हाला राग येणे नैसर्गिक आहे. पण, अशावेळी
तुम्ही शांत बसणे योग्य ठरते. कारण तुमच्या सूचनेचे
महत्त्व पटून बदल सुरू झाल्याचे तुम्हाला काही दिवसांनी
दिसते. म्हणजेच, रागामुळे जे शक्य झाले नसते ते
मौनातून साध्य झाले. ही सवय ठेवल्यास तुम्ही शांत राहाल.
थोडक्यात बोला : बोलणे ही गरज
असली, तरी किती बोलावे याची मर्यादा
पाळायला हवी. थोडक्यात आणि मुद्देसूद बोलण्यामुळे अनेक
कामे लवकर होतात. पण याचा अर्थ तुम्हाला वैराग्य आले
आहे असा घेऊ नका. घरातली एक घटना बघा. तुमचे मूल बाहेर खेळण्यात
रमले आहे आणि तुम्ही त्याला त्याचे होमवर्क पूर्ण करण्यासाठी हाका मारत असता. येतोच आणि होमवर्क करतो असे उत्तर मूल
देते. अशावेळी तुम्ही शांत राहा आणि तुमचे काम करा.
मूल घरी आले आहे आणि तुम्ही शांत बसल्याचे पाहून
होमवर्क करायला लागल्याचे तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येते. त्याऐवजी तुम्ही मुलावर आरडाओरडा केला असतात, तर मूल
रडायला लागले असते आणि मग त्याची समजूत काढण्यात वेळ
गेला असता. म्हणजेच तुम्ही शांत राहिल्यामुळे
मूलही त्याची जबाबदारी ओळखून होमवर्क करायला बसले हा फायदा. मनातील भावना
उघड बोलण्यापेक्षा मौनामुळे कामे लगेच होत असल्याचा अनुभव तुम्हाला
येईल. मौनाचा अभ्यास करणाऱ्यामध्ये धैर्य येते. बोलण्यामुळे अनेक प्रश्न सुटतात हे खरे; पण अविचाराने
बोलल्यास संबंधही बिघडतात. पूर्ण न ऐकता
प्रतिक्रिया देणे अगदी अयोग्य. पण, मौनामुळे
तुमच्यात धैर्य येते आणि त्यातून कोठे, काय आणि
केव्हा बोलावे याची समज तुम्हाला येऊ लागते.