लॉकडाऊनपासून शिकण्यासारखे पाच धडे

18 Apr 2020 10:23:11


 

सध्याचा काळ आगळावेगळा आहे. अवघड आहे आणि आव्हानात्मकही आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाइन याचा अनुभव प्रत्येकाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे येतो आहे. या तीन अनुभवांनी आपले जगणे व्यापून टाकले आहे. सध्याच्या काळाने प्रत्येकापुढे आव्हाने उभी केलेली दिसतात. ती आर्थिक आहेत आणि मानसिक स्वरूपाचीही आहेत. त्यांना सामोरे जाताना प्रत्येकाने काही धडे शिकले पाहिजेत. लॉकडाऊनपासून शिकण्यासारख्या पाच धड्यांच्या टिप्स आपल्याला शेअर करता येतील.


संध्यानंद.कॉम

सध्या येणारा प्रत्येक दिवस नवा तणाव घेऊन येताना दिसतो. टोकाच्या प्रतिकूल स्थितीतही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सध्याची स्थिती कायम राहणारी नाही. ती एक ना एक दिवस नक्कीच पालटेल. जगण्याचा हा टप्पाही संपेल आणि नवा सुरू होईल. या अनुभवातून जाताना व्यक्ती आणि समाज दोन्ही पातळ्यांवर काही बदल झालेले स्पष्टपणे दिसतील. सध्याच्या काळापासून काही गोष्टी शिकून आपण स्वतःतही बदल घडवून आणू शकतो. अशा पाच धड्यांचा विचार करणे रंजक ठरेल.


१. घरातून करता येण्यासारखे बरेच काही आहे अगदी काही आठवड्यांपूर्वी मवर्क फ्रॉम होमफ ही काही जणांशी संबंधित अशी गोष्ट होती. भारतात तर ही संकल्पना अजूनही नवी आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे तिची गरज निर्माण झाली. कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही हा पर्याय अवलंबावा लागत आहे. ऑफिसमध्ये आपण जे काही करतो त्यातील बऱ्याच गोष्टी घरात बसूनही करता येतात, याचा अनुभव आपल्याला येतो आहे. मिटिंग ची जागा आता ई मेल्सनी घेतलेली आहे. बऱ्याच मिटिंग या अनावश्यक असतात, याची जाणीव आपल्याला होऊ लागली आहे. घरातून काम करत असताना अधून मधून छान ब्रेक कसा घ्यायचा, हे आपण शिकून घ्यायचे आहे. थेट व्यक्तीशी संवाद साधण्याची जागा ऑनलाइन इंटरअ‍ॅक्शन कधीच घेऊ शकणार नाही. सर्जनशीलता वा निर्मितीक्षमतेचा वापर करून जी कामे करायची असतात ती परस्परांमधील संवादातून चांगली होतात, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. काही जॉब हे रिमोट कंट्रोलने करताच येत नाहीत. ते करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थिती लागते. तरीही आता मवर्क फ्रॉम होमफचा विचार समाजातील प्रत्येक घटकाला करावाच लागेल. हा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने सध्याच्या काळात केला पाहिजे. लॉकडाऊन नंतरच्या काळात कंपन्यांनाही यासंबंधीचे धोरण ठरवावे लागेल. वर्क फ्रॉम होमचे फायदे-तोटे त्यांना पडताळून पाहावे लागतील. कर्मचाऱ्यांनाही या धोरणाचे काही लाभ होऊ शकतात. घरातून करता येण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या सुलभतेने कशा करता येतील, हे आपण लॉकडाऊन काळात शिकून घेतले पाहिजे.


२. कमी खर्चात कसे भागवता येईल ? लॉकडाऊनमुळे नोकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपली नोकरी टिकणार की जाणार? हा प्रश्न बहुसंख्य कामगारांच्या मनात आहे. पगार कपातीचे संकटही अनेकांपुढे उभे आहे. रोजीरोटीच्या भयाने लोकांचे चेहेरे काळवंडून गेले आहेत. मात्र, या भयाला रुपेरी किनारही आहे. किती पैशात आपले भागू शकते याचा रोकडा अनुभव लॉकडाऊनने प्रत्येकाला दिला आहे. सर्वच कुटुंबांचा अनावश्यक खर्च सध्या थांबला आहे. प्रवासाचा मोठा खर्च कोणालाही करावा लागत नाही. काही आठवड्यांच्या लॉकडाऊनपासून महत्त्वाची गोष्ट आपण शिकू शकतो ती म्हणजे कमीत कमी खर्चात स्वतःचे आणि कुटुंबाचे कसे भागवायचे ? गरजांसाठी आपल्याला किती खर्च करावा लागतो आणि ऐषोआरामासाठी किती खर्च करावा लागतो हे लॉकडाऊनचा काळ प्रत्येकाला शिकवतो आहे. दोन्ही वेळचे जेवण घरीच करणे ही आर्थिक नियोजनाला हातभार लावणारी गोष्ट आहे. घरचे जेवण आरोग्यदायीही असते. सध्या भरपूर वेळ हाताशी असल्याने आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी शिकू शकतो. अन्नपदार्थ वाया जाऊ न देणे हा यातील पहिला धडा. या धड्यातून आपण कितीतरी पैसे वाचवू शकतो. कमी खर्चात भागवता येणे ही भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपयुक्त सवय ठरेल.


३. निसर्गाची शक्ती ओळखणे भारताची राजधानी दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर. ते सध्या मोकळा श्वास घेते आहे. कित्येक दशकांनंतर दिल्लीकरांना ताज्या हवेचा लाभ होत आहे. दिल्लीसारखाच अनुभव बँकॉक, साओ पावलो, बोगाटा या शहरांमधील रहिवाशांनाही येत आहे. माणसांचा कोलाहल थांबल्याने आता प्राणी उत्सुकतेने शहरांमध्ये फेरफटका मारत आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांजवळ डॉल्फिन पाहायला मिळाले. पहाडी भागातील मेंढ्या ऑस्ट्रियातील शहरांमधील रस्त्यांवरून फिरताना दिसल्या. प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही लॉकडाऊनमुळे मोकळा श्वास घेता येणे शक्य झाले. यातून निसर्गाचे चक्र चालू राहणे हे किती महत्त्वाचे आहे, हे आपण शिकले पाहिजे. निसर्गाशी जवळीक माणसाच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही आवश्यक असते, हे जाणून घेऊन आपण पर्यावरणस्नेही झाले पाहिजे. प्रदूषणमुक्त जगणे शिकून घेतले पाहिजे.


४. बातम्या किती ऐकायच्या ते ठरवणे : कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे बातम्यांचा आपल्यावर अक्षरशः मारा होत आहे. हा मारा होऊ द्यायचा की नाही, ते आपणच ठरवायचे असते. बातम्या दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा ऐकणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. बातम्यांमुळे आपली जिज्ञासा भागते. पण, सतत बातम्यांमध्ये गुंतून पडणे म्हणजे स्वतःला सापळ्यात अडकवून घेण्यासारखे आहे. मतं-मतांतरे, अंदाज, प्रतिक्रिया आणि वाद यामुळे टीव्हीवरील बातम्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने सत्य सांगितले जाते. त्यातून अस्वस्थता वाढत जाते. चॅनल्सवरील बातम्यांबाबत स्वतःचे धोरण निश्चित करण्यासाठी लॉकडाऊन हा उत्तम काळ आहे. या काळात कोणते न्यूज चॅनेल विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहे, या चॅनेलसाठी किती वेळ द्यायचा हे आपण नक्की केले पाहिजे. यासंबंधीचे धडे आपण सध्याच्या काळात गिरवले पाहिजेत. मानसिक निरोगीपणासाठी ते आवश्यक आहे.


५. स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखणे वुहानमधील कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी चीनच्या सरकारने भीतिदायक असे उपाय अवलंबले. लोकांच्या स्वातंत्र्यावर वरवंटा फिरवून त्यांच्यात दहशत निर्माण केली. ही स्थिती जगातील कोणत्याही देशात निर्माण होऊ शकते. हे वास्तव लक्षात घेऊन आपण स्वातंत्र्याचे महत्त्व काय असते, ते शिकून घेतले पाहिजे. हवी तेव्हा कqटग करण्याचे, पाहिजे ती वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असले पाहिजे. आपल्याला हवे तेव्हा कुटुंबीयांना आणि मित्रांना भेटता आले पाहिजे. व्यक्तीचे स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे याचा धडा लॉकडाऊन सध्या आपल्याला रोज देत आहे. तो आपण शिकून घेतला पाहिजे.
Powered By Sangraha 9.0