अजातशत्रु हा येथील किल्ला बांधीत असता गौतमबुद्धाने भविष्य केले की, पुढे हे मोठे शहर होईल पुढे हूणांनी स्वारी करून गुप्तांचा पाडाव केला व हे शहर उद्ध्वस्त केले. यानंतर कनोज शहरास महत्त्व प्राप्त झाले.
पाटलीपुत्र शहराला (सध्याचे बिहारमधील पटना) कुसुमपुर असेही नाव होतें. ख्रिस्ती शकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकांत झालेल्या गार्गीसंहितेंत कुसुमध्वज असाही एक पाटलीपुत्राचा उल्लेख येतो. पुप्पपुर हेही एक दुसरें नांव पाटलीपुत्रास लावतात. सर्वांचा अर्थ एक (फुलांचें शहर) च आहे. पाटलीं हें एका फुलाचें नांव होय.
अजातशत्रुनें (ख्रि. पू. ५५४) या शहराचा पाया घातला. पूर्वी पाटली नांवाचें हें एक खेडें होतें. अजातशत्रूनें तेथें एक किल्ला बांधला. शोण व गंगा यांच्या संगमाच्या दक्षिणेस हा किल्ला होता. नंतर अजातशत्रुच्या नातवानें (उदयानें) शहराचा विस्तार केला. या वेळेपासून पुढें अनेक शतकें हें गांव राजधानी म्हणून प्रख्यात राहिलें. मौर्यांच्या वेळीं फक्त मगधाचीच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानची राजधानी होती.
महापरिब्निबाणसुत्तांत येथील किल्ल्याची गोष्ट आली आहे. वायुपुराणांत उदयासंबंधीं व या शहराच्या वसाहतीची कथा आहे. अशोकानें हें शहर जरी आपली कायमची राजधानी केली, तरी तत्पूर्वीही चंद्रगुप्ताचें हें एक आवडतें राहण्याचें ठिकाण होतें; येथेंच त्याची भेट मेगॅस्थेनीसनें घेतली होती. ग्रीक लोक याला पालिबोथ्रा म्हणत असत. चिनी लोक यास कुसुमोपुलो म्हणत. आर्यभट्ट हा येथीलच राहणारा होता.
मेगॅस्थेनीसनें केलेलें याचें वर्णन असें- पालिबोथ्रा हें इंडियाचें मुख्य ठिकाण असून तें इरानाबो व गंगा यांच्या संगमावर आहे. त्याची लांबी ८० स्टाडिआ व रुंदी १५ स्टाडिआ असून सभोंवतालचा खंदक ३० क्युबिक खोल आहे. शहराभोंवतालच्या तटास ५७० बुरूज ६४ वेशी आहेत. सेल्युकस निकेटर याच्या वेळीं शहराचा घेर १२ कोस होता. अजातशत्रु हा येथील किल्ला बांधीत असतां गौतमबुद्धानें भविष्य केलें कीं, पुढें हें मोठें शहर होईल पुढें हूणांनीं स्वारी करून गुप्तांचा पाडाव केला व हें शहर उध्वस्त केलें. यानंतर कनोज शहरास महत्त्व प्राप्त झालें.