
खऱ्या अर्थाने परमेश्वरावर जिव्हाळा जाेपासणाऱ्यास जीवांच्या बाबतीत जिव्हाळा जाेपासा, असे सांगावे लागत नाही. कारण सर्व जीवमात्रात भगवंताला पाहण्याची यांची वृत्ती आपाेआप सर्व जीवमात्रात भगवंताला पाहते आणि त्यांच्याबाबत जिव्हाळा जाेपासते. चाैदाशे वर्षे तपश्चर्या करून अहंकार बळावलेल्या चांगदेवाला ज्ञानदेवांनी आदरपूर्वक हृदयाशी लावून घेतले. नाथांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या वाळवंटातील मुलाला समाजाच्या विराेधाचा विचार न करता तत्काळ उचलून कडेवर घेतले, तुकाेबांनी त्यांची अवहेलना करणाऱ्या जीवांवर क्राेध न करता त्यांना जवळ घेतले.अशा अनेक घटना आपल्या डाेळ्यासमाेर आहेत.या घटनांतून आपल्या लक्षात येते की ही संत मंडळी म्हणजे चालते बाेलते भगवंतच हाेत. या सर्व चालत्या बाेलत्या भगवंतांनी आपणा सर्वांना जिव्हाळा जाेपासण्याचाच संदेश दिला आहे.आपल्याकडून जाेपासला जाणारा जिव्हाळा हा मर्यादित लाेकांसाठी आणि स्वार्थापाेटी नसावा.कारण जिव्हाळ्यात मर्यादेला आणि स्वार्थाला स्थान दिले की जिव्हाळ्याची व्यापकता नष्ट हाेते. प्रत्येकाकडे कांही प्रमाणात का हाेईना जिव्हाळा हा असताेच. याची व्यापकता वाढविण्यासाठी ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध आदींना काढून टाकावे लागते, हे लक्षात असून द्यावे. जय जय राम कृष्ण हरी।
डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माउली निवास, श्री माउलीनगर, जालना, माे. 9422216448