
जिव्हाळा हा शब्द आपल्यासाठी नवीन नसला तरी जिव्हाळा या शब्दाची प्रत्यक्ष अनुभूती मात्र अत्यंत कमी लाेकांना आलेली असते. जेथे जिव्हाळा असताे, तेथे ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, मीपणा आदीला स्थान नसते.अर्थात जिव्हाळा जेथे नि:स्वार्थ प्रेम तेथे असे म्हटले, तर वावगे हाेणार नाही. एका जिव्हाळ्याने जीवनातील अनेक प्रश्न मार्गी लागत असले, तरी संसारात अडकलेल्या या जीवाला जिव्हाळ्याची जाेपासणूक करता येत नाही, हे सत्य आहे. जाे मन:पूर्वक जिव्हाळा जाेपासताे, ताे एक प्रकारे समता, बंधुता, नि:स्वार्थ प्रेम, कर्तव्याची जाेपासणूक करताे. अशा लाेकांकडे मीपणाला स्थान नसल्याने यांच्याकडून हाेणारी भक्ती व्यवहाराला स्थान देत नाही. अर्थात यांच्याकडे स्वार्थ, अहंकार, लाेभ आदीला स्थान नसल्याने यांच्याकडून हाेणारी भक्ती ही जिव्हाळ्याची भक्ती हाेते.
अशी जिव्हाळ्याची भक्ती करणारे लाेक म्हणजे चालते बाेलते भगवंतच हाेय. असे लाेक देवाचे पुतळेच असतात. या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा । ताेचि दैवाचा पुतळा ।। समाजात तर साेडाच, पण घरातल्या सदस्यांबराेबरही अनेक लाेक जिव्हाळा जाेपासत नाहीत. असे वागणे काेणाच्याही हिताचे नसते. त्यामुळे जिव्हाळा जाेपासायलाच हवा.जय जय राम कृष्ण हरी
। डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माउली निवास, श्री माउलीनगर, जालना, माे. 9422216448