देवीला अर्पण केलं जाणारं व मार्गशीर्ष महिन्यात अनेक स्त्रियांच्या आंबाड्यात दिसणारं शेवंतीचं फूल मुळात चीनमधून आलं आहे. या फुलांवरून हात फिरवला तर त्याचा सुगंध आपल्या हाताला लागताे. असं हे शेवंतीचं आकर्षक, सुगंधी फूल असतं. शेवंती लाल, पिवळी, पांढरी, जांभळी अशा अनेक रंगांत असते. जमिनीला लागून चारही बाजूंनी याच्या फांद्या फुटतात व त्यावर हिरव्या रंगाची पाने येतात. नंतर प्रत्येक फांदीच्या टाेकाला लहान माेठ्या गुंडीच्या आकाराच्या कळ्या येतात. हळूच एक एक कळी माेठी हाेते. पाकळ्या उलगडत हळुवारपणे गाेल आकाराच्या असंख्य पाकळ्या असलेलं सुंदर फुल उमलतं. सर्व फुलं उमलली की, एका सुंदर पुष्पगुच्छासारखं ते झाड दिसतं. ही फुले झाडावर किंवा ताेडून पाण्यात ठेवली तरी टिकतात.भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात शेवंतीच्या लागवडीत अहमदनगर जिल्हा अग्रेसर असून पुणे, नाशिक साेलापूर, सांगली, सातारा व नागपूर या जिल्ह्यांतही तिची लागवड केली जाते. शेवंतीच्या फुलांचा उपयाेग हार, गुच्छ, वेण्या बनविण्यासाठी, तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी माेठ्या प्रमाणात केला जाताे. शेवंतीच्या माेठ्या आकारातील फुलांना माेठ्या हाॅटेल्समधून फ्लाॅवर म्हणून चांगली मागणी आहे. लाल, जांभळ्या, पिवळ्या, लाल, पांढऱ्या फुलांचे उद्यानातील ताटवे, तसेच इमारतीसमाेरील लहान माेठे ताटवे खूप मनाेवेधक दिसतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताच्या दिवशी शेवंतीच्या वेणीला मान दिला जाताे.